वर्धा : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून अनेक वर्षे गाजले. मात्र त्यांनी काय केलं ते जनतेला कळू लागले आहे. कुटुंबाच्या पलिकडे त्यांनी कामं केली नाही. आम्ही देशाचा, राज्याचा विकास करीत आहोत. छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी (Narendra Modi) ” असे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं. ते वर्ध्यात बोलत होते. हंसराज अहीर यांनी वर्ध्यातील बॅचलर रोडवर स्थापित होणाऱ्या सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी पत्रकारांसोबत संवाद साधला.
“जाणता राजा हा शब्द सर्वांना लागू होत नाही, खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या देशाची गरज काय ओळखून त्यांनी देशाच्या विकासाची कामं हाती घेतली. देशाच्या सीमा रक्षणापासून, सुरक्षेपर्यंत, कृषीप्रधान देश आणि लोकसंख्या पाहून कामं हाती घेतली, म्हणून देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल छत्रपती शिवरायांनंतर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्यांनी या देशाच भवितव्य, वैभव जगाला दाखवून दिलं, म्हणून लोकांचं आकर्षण भाजपकडे आहे. येणारी काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी मोदी, फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे, याला महत्व नाही, येणारे पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहेत”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
देशात सावरकर भक्तांचं सरकार
सध्या देशात सावरकर भक्तांचं सरकार आहे. ही मंडळी अखंड भारताचं स्वप्न उराशी बाळगून आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
देशातलं सरकार जे आहे, त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शाहांपर्यंत, आपले नितीन गडकरी या सगळ्यांना मी निस्सीम भक्त म्हणून ओळखतो, हे सावरकरांचे फार निस्सीम भक्त आहेत. मी अमित शहांच्या बंगल्यामध्ये पाहिलं त्यांच्या बंगल्यात आणि ऑफिसमध्ये सावरकरांची प्रतिमा आहे, लहान पुतळा आहे, असं हंसराज अहीर म्हणाले.
या देशभक्त सावरकर भक्तांच्या सरकारमध्ये 370, 35 अ हटवणे एवढं मर्यादित सरकारचं काम राहणार नाही. अखंड भारताचं स्वप्न पाहणारी मंडळी सत्तेमध्ये आहेत. देशाच्या रक्षणासाठी आम्ही सत्तेमध्ये आलो आहे. प्रधानमंत्री पहिल्या दिवशी म्हणाले होते, देश की रक्षा करनी है, सीमा की सुरक्षा करनी है. हा देश आता सुरक्षित, संपन्न, सामर्थ्यवान बनत आहे. त्यामध्ये प्रेरणा सावरकरांची आणि सावरकरांसारख्या देशभक्तांचीच आहे, असंही हंसराज अहीर यांनी नमूद केलं.