ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये आयोजित ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी 50 हजारांपेक्षा अधिक संख्येने जमलेल्या नागरिकांमध्ये मोदींनी ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’चा नारा (Narendra Modi in Howdy Modi) लगावला. पुढच्या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला महत्त्व होतं.
‘डोनाल्ड ट्रम्प यांची वेगळी ओळख करुन देण्याची कोणाला गरज भासत नाही. कारण पृथ्वीतलावरील प्रत्येकाला त्यांचं नाव माहित आहे. त्यांचं नेतृत्व, अमेरिकेबाबत त्यांच्या मनातील प्रेम, प्रत्येक अमेरिकन नागरिकासाठी त्यांच्या मनात असलेली चिंता या गोष्टी प्रशंसेस पात्र आहेत. मी पहिल्यांदा ट्रम्पना भेटलो, तेव्हाच त्यांनी मला सांगितलं, की व्हाईट हाऊसमध्ये भारताचा खरा मित्र आहे.’ अशा शब्दात नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्यावर (Narendra Modi in Howdy Modi) स्तुतिसुमनं उधळली.
ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियमच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचं स्वागत केलं. ‘भारतीय नागरिक स्वतःला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी रिलेट करु शकतात. अब की बार ट्रम्प सरकार हे शब्दही तुम्हाला स्पष्टपणे समजले असतील.’ असं मोदी म्हणताच ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींसाठी भाजपने दिलेल्या ‘अबकी बार, मोदी सरकार’ नाऱ्याचं हे पुनरावलोकन होतं.
पाकिस्तानवर तोफ
या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर बरसले. 9/11 (अमेरिका वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला) आणि 26/11 (मुंबईवरील हल्ला) यांचे सूत्रधार कुठे सापडतात? असा प्रश्न विचारत, ‘ज्यांच्याकडून स्वतःचा देश सांभाळला जात नाही, त्यांनी भारतावरील आपल्या तिरस्काराला राजकारणाचं केंद्र बनवलं आहे’, असा घणाघात मोदींनी केला.
‘हे तेच लोक आहेत, ज्यांना अशांतता हवी आहे. दहशतवादाचे समर्थक, पोषणकर्ते.. तुम्हाला त्यांची चांगलीच ओळख आहे. मात्र आता दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला थारा देणाऱ्यांविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प या लढाईत दहशतवादाविरोधात उभे राहिल्याचं मी जोर देऊन सांगू इच्छितो’ असं मोदी म्हणाले.
HOWDY MODI : दहशतवादाविरोधात लढाईची वेळ, ट्रम्पही भारतासोबत : नरेंद्र मोदी
‘कलम 370 चा फायदा फुटीरतावादी नेते उचलत होते. मात्र आता जम्मू काश्मीरमधील नागरिकांनाही भारतातील अन्य भागातील नागरिकांच्या जोडीने समान अधिकार देण्यात आले आहेत.’ असं सांगत नरेंद्र मोदींनी काश्मीरच्या मुद्द्यालाही स्पर्श केला.
ट्रम्प यांचा उभं राहून टाळ्यांचा कडकडाट
मोदींच्या भाषणानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. मोदी व्यासपीठावरुन खाली उतरताच एका सुरक्षारक्षकाने त्यांना बाहेर जाण्याची दिशा दाखवली, मात्र त्याऐवजी मोदी ट्रम्प यांच्या दिशेने चालत गेले. मोदींनी ट्रम्प यांच्याशी दोन्ही हातांनी हस्तांदोलन केलं. अमेरिकन खासदारांसोबत मोदी आणि ट्रम्प यांनी वार्तालाप केला. त्यानंतर दोघंही स्टेडियममध्ये फिरत होते.
‘दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका आणि इस्राईल जोमाने उभे आहेत. कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या धोक्यापासून निर्दोष नागरिकांची रक्षा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या समुदायाला सुरक्षित राखण्यासाठी सीमेचं रक्षण करण्याची गरज आहे’ असं याआधी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडे भारतीय वंशाच्या नागरिकांचा कल असल्याचं मानलं जातं. त्यामुळे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय समुदायाला खुश करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. अमेरिकेत भारतीयांचं प्रमाण वाढत असून निवडणुकांमध्येही त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.