Chandrayaan-2 : नासाकडून कौतुकाची थाप, इस्रोला मोठी ऑफर

| Updated on: Sep 09, 2019 | 12:09 PM

चंद्रयान-2 (Chandrayaan-2) नंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.

Chandrayaan-2 : नासाकडून कौतुकाची थाप, इस्रोला मोठी ऑफर
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) चंद्रयान-2 (Chandrayaan-2) मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं (ISRO) कौतुक केलं आहे. इस्रोची चंद्रयान-2 मोहिम अत्यंत प्रेरणादायी असल्याचंही नासानं म्हटलं. विशेष म्हणजे नासाने इस्रोला मोठी ऑफरही दिली आहे.

चंद्रयान-2 मोहिमेत विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग पूर्ण होण्यासाठी अवघे काही क्षण बाकी असताना इस्रोचा लँडरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर देशभरातून इस्रोच्या कामाची प्रशंसा झाली. तसेच इस्रोला भविष्यातील कामासाठी सदिच्छा देण्यात आल्या. आता नासाने देखील इस्रोच्या कामाचं कौतुक केलं आहे.


नासाने इस्रोचं कौतुक करताना म्हटलं, “अंतराळात अनेक अडथळे येत असतात. आम्ही इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेतून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगच्या प्रयत्नांचं कौतुक करतो. इस्रोच्या या प्रवासाने आम्हाला प्रेरणा दिली आहे. भविष्यात इस्रोसोबत सौरमालेचा अभ्यास करण्याच्या संधींची आम्ही वाट पाहतो आहे.”

नासा स्पेसफ्लाईटचे जाणकार क्रिस जी-एनएसएफ यांनी म्हटलं, “विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी झाला, तरी ऑर्बिटर अजूनही तेथेच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ऑर्बिटरमधूनच 95 टक्के प्रयोग केले जात आहे. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत अगदी सुरक्षित असून आपली मोहिम पूर्ण करत आहे. इस्रोची ही मोहिम पूर्णपणे अपयशी नक्कीच नाही.”

एरिजोना स्टेट यूनिवर्सिटीच्या अंतराळ तंत्रज्ञान विभागाच्या संशोधक संचालक डॉ. तान्या हॅरिसन यांनीही इस्रोच्या या मोहिमेचं कौतुक केलं. तसेच मोहिमेतील महिलांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मोहिम नियंत्रणात अनेक महिलांचा सहभाग होता. हे पाहून खूप आनंद झाला.” हॅरिसन मार्स अॅपोर्च्यूनिटी रोवर टीमच्याही सदस्य आहेत.

इस्रोने रविवारी (8 सप्टेंबर) लँडरचं स्थान समजल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत.