नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) मार्च महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत येत्या 15 मार्चला संपतेय. त्यापूर्वी एक मार्चला त्यांना नगरविकास विभागाकडून पत्र येईल आणि 20 एप्रिलनंतर कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान त्यापूर्वी नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यावर 14 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. महापालिकेच्या वतीने या हरकती 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी या विहित नमुन्यात विवरण पत्रासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील आणि निवडणूक जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशी झाली प्रभाग रचना…
महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला.
एक प्रभाग 33 हजारांचा
पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभाग रचनेचे काम पुन्हा करावे लागले. प्रभाग रचना तयार करताना प्रत्येक प्रभागानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यात चतुःसीमा, रस्ते, नदी-नाले याच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासण्यात आले. नाशिकमधील काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप होते. ते सुद्धा ध्यानात घेतले. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली.
सोयीच्या खेळीची चर्चा
महापालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांनी त्यासाठी खेळी केली असून, आपल्या सोयीनुसार वार्डांची रचना केली आहे आणि आपल्याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ही सारी चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. सध्याच्या प्रभाग क्रमांक 11 मधील कामगारनगर हा परिसर महात्मानगरला जोडण्यात आल्याचे समजते. असे प्रकार इतर ठिकाणीही झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये संताप आहे. याप्रकरणी सातपूर येथील विभाग संघटक प्रशांत दैतकार-पाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे.
अशी होणार निवडणूक…
– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग
– आता 133 नगरसेवक
– एकूण प्रभाग 44
– 43 प्रभाग 3 सदस्यीय
– 1 प्रभाग 4 सदस्यीय
पक्षीय बलाबल
– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)
– शिवसेना – 35 (सध्या 33)
– राष्ट्रवादी – 6
– काँग्रेस – 6
– मनसे – 5
– अपक्ष – 4
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?