नाशिक : नाशिकमध्ये एसटी आणि अॅपे रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातातील मृतांचा आकडा 25 वर पोहचला आहे. अपघातानंतर दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली होती (ST-Rickshaw Accident). मालेगाव-देवळा रस्त्यावर झालेल्या अपघातात 35 जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी एसटीतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवलं होतं. (ST-Rickshaw Accident).
कळवण डेपोची उमराणे-देवळा एसटी बस मालेगावहून धोबीघाट मेशीकडे जात होती. धोबीघाट परिसरात देश-विदेश हॉटेलजवळ एसटी आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रिक्षावर धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस आणि रिक्षा ही दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
बसची मागील काच फोडून बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तसेच, बस आणि रिक्षाला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. या अपघातात 25 जणांचा नाहक बळी गेला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना मालेगाव देवळा येथील रुग्णालयात, तर काहींना उमराणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.