नाशिक : जम्मू-काश्मिरमधील बडगाम येथे भारतीय हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत माहाराष्ट्रचा वीरपुत्र शहीद झाला आहे. नाशिकचे वैमानिक स्कॉर्डन लीडर निनाद मांडवगणे हे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. निनाद मांडवगणे यांच्यासह आणखी सहा जवान या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याची माहिती देण्यात आली होती.
नाशिकचे स्कॉर्डन लीडर निनाद मांडवगणे हे औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांची निवड पुण्यातील एनडीएत झाली आणि त्यानंतर ते 2009 साली हेलिकॉप्टरचे पायलट म्हणून हवाई दलात रुजू झाले. निनाद यांची पोस्टिंग सध्या श्रीनगरमध्ये होती. तिथेच झालेल्या या दुर्घटनेत निनाद यांना वीरमरण आले.
निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांची एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निनाद यांचे कुटुंब लखनौला गेलेले होते. निनाद हे शदीह झाल्याने या आनंदाच्या वातावरणात त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मंगळवारी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक केला. तेव्हापासूनच भारत आणि पाकिस्तानकडून सीमावर्ती भागांवर गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर आज पाकिस्तानने भरदिवसा भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय वायुसेनेने पाकच्या विमानांना पळवून लावले. यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला आहे.