नवी मुंबई : एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची (APMC Market trader Corona Positive) लागण झाली आहे. या व्यापाऱ्याला कोरोना झाल्याचे समजताच बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यात भीतीचे वातावरण पसरलं आहे. हा व्यापारी सानपाड्यातील पामबीचजवळ राहतो. या व्यक्तीला उपचारासाठी वाशीच्या मनपा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवी मुंबई महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यापाराचे (APMC Market trader Corona Positive) नवी मुंबईतील धान्य मार्केटमधील L विंग मध्ये धान्याचे दुकान आहे. आज या व्यापाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याची ट्रव्हल हिस्ट्री तपासण्यात येणार आहे. तसेच तो किती वेळा बाजारात गेला? त्याशिवाय अन्य किती ठिकाणी त्याचा वावर होता याचा शोध आरोग्य अधिकारी घेत आहेत.
दरम्यान हा कोरोनाबाधित व्यापारी दोन ते तीन वेळा बाजारात आला होता, अशी माहिती काही व्यापारांनी दिली. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे काल (16 एप्रिल) धान्य मार्केटमध्ये डाळी आणि धान्य 300 ते 325 गाड्यांची आवक झाली. आज (17 एप्रिल) मुंबईतील काही कडधान्य पुरवठा करणारे व्यापारीही बाजारात वाहतुकीसाठी आले होते. मात्र धान्य मार्केटमधील व्यापाराला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच जवळपास 80 टक्के व्यापारी बाजारातून निघून गेले. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईला कडधान्य पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर काही दिवस एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मार्केट सुरु झाल्यावर अनेक ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी केली. ही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी समितीच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटच्या गेटवर थर्मल चेकअप, सॅनिटायझर आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश देण्यात यावा, अशा जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला. तसेच सोशल डिस्टन्सिंगसाठी आवाहनही करण्यात आले. मात्र तरीही गर्दी कमी होत नसल्याचे हा बाजार खारघर येथे हलवण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात 170 जागेची हॉटस्पॉट यादी जाहीर करण्यात आले आहे. या यादीत नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत असल्याने नवी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले (APMC Market trader Corona Positive) आहे.