नवी मुंबई : नवी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असावे यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला होता. या मागणीची दखल घेऊन महानगरपालिकेने स्मारकाचा ठराव तयार केला. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 1 नोव्हेंबर 2017 मध्ये करण्यात आले, परंतु यानंतरही अंतर्गत सजावटीची कामे अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना पूर्ण स्मारक पाहता येत नव्हते. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
काम पूर्ण होत आले असताना लोकार्पण
स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. काम पूर्ण होत आले असून त्याआधीच लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्तेच्या बाबतीत फार मोठी उंची होती. त्यांचे नवी मुंबईतील ऐरोलीत कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले भव्य स्मारक प्रशंसनीय आहे. त्यामुळे हे स्मारक पाहण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून ठरेल, असा विश्वास राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐरोलीत व्यक्त केला आहे.
बाबासाहेबांची पुस्तके, पत्रं वाचायला मिळणार
बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तके लिहिली आहेत, तसेच त्यांची दुर्मीळ पत्रे या ठिकाणी पाहण्यासाठी मिळतात, संगणकीय लायब्ररी, तसेच बाबासाहेबांचा संपूर्ण बालपणापासूनचा जीवन प्रवास यात आहे. त्यांचे दुर्मीळ क्षणसुद्धा पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे त्यांचा जीवनपट जवळून पाहता येईल, हे स्मारक सर्वांना प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे आहे. असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.