मुंबई : एनसीबीने ड्रग्स तस्करी प्रकरणी गुंड समीर मुख्तार सय्यद ऊर्फ सलीम लंगडा याच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे सलीम लंगडा हा गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. तो अनेक दिवसांपासून एनसीबीच्या रडारवर होता. अखेर एनसीबीने त्याला काल रात्री जोगेश्वरी परिसरातून अटक केली. एनसीबीला त्याच्याकडे 1 किलोपेक्षा अधिक चरस, एमडी ड्रग्स आणि 17 लाख रोख रक्कम मिळाली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याजवळ आढळलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
एनसीबीने काल रात्री मुंबईतील अंधेरी, लोखंडवाला, जोगेश्वरी भागात छापा टाकून 3 जणांना अटक केली. यामध्ये गुंड सलीम लंगडासह त्याचा एक साथीदार मोहम्मद अहमद समसुद्दीन शेख याचादेखील समावेश आहे. गँगस्टर सलीम लंगडावर अंधेरी ते वांद्रे येथे एमडी ड्रग्स पुरवतो. खरंतर हा मुंबईत ड्रग्स विक्रीचा बादशाह आहे. त्याच्यावर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात खंडणी, हत्येचा गुन्हा दाखल आहे.
एनसीबीने या दोघांव्यतिरिक्त आणखी एकाला अटक केली आहे. हा ड्रग्स पेडलर बॉलिवूड जगतातील दिग्गजांना ड्रग्स पुरवायचा. त्याने अभिनेता एजाज खानला देखील ड्रग्स पुरवले होते. या आरोपीचं नाव झाकीर सय्यद ऊर्फ चिकना असं आहे. एनसीबी अधिकारी अनेक महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर काल रात्रीच्या छाप्यादरम्यान झाकीर सय्यद स्वत: एनसीबीला पाहून इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन पळाला. एनसीबीने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. झाकीर याला मुंबईच्या अँटी नारकोटिक्स सेलच्या पथकाने ड्रग्स प्रकरणात 2010, 2019 आणि 2020 मध्ये अटक केली होती.
गेले काही दिवस एनसीबीची ड्रग्जच्या विरोधात धडक कारवाई सुरु आहे. ड्रग्ज तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचीही ड्रग्ज माफियांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु आहे. मुंबईमध्ये एनसीबीमार्फत गेल्या अनेक महिन्यांपासून झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात सतत कारवाई सुरू आहे. दक्षिण मुंबईमध्ये अनेक ड्रग कारखाने उध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ड्रग माफिया किंवा पेडलर्स हे धार्मिक स्थळांच्या आड ड्रग्जचा धंदा करत असल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा : एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक