मला जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये; धनंजय मुंडेंकडून फोनवरुन पंकजांच्या तब्येतीची विचारपूस

| Updated on: Dec 01, 2020 | 11:11 PM

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. | Pankaja Munde

मला जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये; धनंजय मुंडेंकडून फोनवरुन पंकजांच्या तब्येतीची विचारपूस
Follow us on

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा यांना प्रकृतीला काळजी घेण्याचा सल्ला दिला. या आजारात होणारा त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना दिल्याचे समजते. (Dhananjay Munde phone call to Pankaja Munde to take care of her health)

कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या आता होम आयसोलाटेड आहेत.  पंकजा मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती आज सकाळीच समोर आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती दिली होती.

पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी, असे पंकजा यांनी म्हटले होते. त्यामुळे पंकजा यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानही करता आले नव्हते.

मात्र, यानिमित्ताने पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा एकदा संवाद झाला. काही दिवसांपूर्वी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळीही हे दोघे भेटले होते.

पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर, कोणीही वेगळा अर्थ काढू नये; प्रीतम मुंडेंचं आवाहन

पंकजा यांनी ट्विट करून आपण मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. तब्येत खराब असल्यानेच भाजप नेत्या पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर आहेत, कोणीही याचा वेगळा अर्थ काढू नये, असे आवाहन भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना करावे लागले होते.

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर, कोणीही वेगळा अर्थ काढू नये; प्रीतम मुंडेंचं आवाहन

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाची धामधूम, मतदानापूर्वी पंकजा मुंडे ‘आयसोलेट’

PHOTOS : तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट, दोघांच्याही चेहऱ्यावर ‘मुस्कान’

(Dhananjay Munde phone call to Pankaja Munde to take care of his health)