एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल

| Updated on: Nov 15, 2020 | 12:37 PM

राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असलेले आणि नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल
Follow us on

जळगाव: भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली आहे. रोहिणी खडसे या जिल्ह्यातील राजकारणात सक्रीय आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. रोहिणी खडसे यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रकृती उत्तम असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. (NCP leader Rohini Khadse corona positive)

राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत नुकताच  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई पार पडलेल्या समारंभात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

येत्या काळात राष्ट्रवादी बळकट करु- रोहिणी खडसे

एकनाथ खडसेंवर झालेल्या अन्यायामुळे आम्हाला कुटुंब म्हणून त्रास झाला, असं सांगताना आता यापुढच्या काळात राष्ट्रवादीचं मोठं काम आम्ही उभा करु, असा निर्धार रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यक्त केला. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी आमचं स्वागत करण्यात आले. मुंबईपासून जळगावला येईपर्यंत प्रत्येक 10 कि.मी. अंतरावर कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या स्वागताला उभे होते. पक्ष सोडल्यापासून आमचे कार्यकर्ते तसंच नव्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आनंदात आहेत. राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे आमचं स्वागत केलं त्यांच्या आम्ही ऋणात राहू इच्छितो”, अशी भावना रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली होती.

एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये खडसे पिता-पुत्रीचं स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंचं नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संबंधित बातम्या:

भाऊंवर झालेल्या अन्यायामुळे कुटुंब म्हणून आम्हाला त्रास, येत्या काळात राष्ट्रवादी बळकट करु : रोहिणी खडसे

‘टिक टिक वाजते…’ खडसेंच्या राजीनाम्यानंतर कन्या रोहिणी खडसेंचा फेसबुकवर सूचक फोटो

NCP leader Rohini Khadse corona positive