मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी संपली आहे. तब्बल बारा तास चाललेल्या ईडी चौकशीनंतर रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले आहेत. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. रोहित पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळेसोबत आहेत. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते घोषणा देत आहेत. बाहेर आल्यावर रोहित पवार यांनी गॅलरीमधून राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.
रोहित पवार यांची बारामती अॅग्रोमधील कथित घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. रोहित पवार ईडीच्या कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता गेले होते. संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाडही आज रोहित पवारांसोबतच होते. आपली लढाई संपली नसल्याचं रोहित पवार यांनी सांगत 1 फेब्रुवारीला परत एकदा चौकशीसाठी बोलावल्याचं म्हटलं आहे.
रोहित पवारांनी यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि नेत्यांचे आभार मानले. माझी चर्चा सुरु असताना तुमचा सर्वांचा आवाज कानापर्यंत पोहोचत होता. यातूनच मला प्रेरणा मिळत होती. आपल्या विचाराचा आमदार अडचणीत येतो आणि त्याच्यावर अन्याय होतोय हे सर्वांचे लाडके नेते शरद पवार यांना समजल्यावर ते इथं येऊन बसले होते. शरद पवार बापमाणूस भक्कमपणे पाठिमागे असतात. कारण पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्याच्या मागे शरद पवार थांबत असल्याचं रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर कधी झुकत नाही आणि झुकणारही नाही. शरद पवार युवकांना संधी देतात आणि अडचणीत असताना साथ देतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे आपण देत आहोत. एक तारखेला चौकशीसाठी बोलावलं आहे. आपली लढाई सुरुच राहणार आहे. चौकशी सुरू असताना काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे फोन आले. सर्वांचे आभार असं रोहित पवार म्हणाले.