मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावरून शदर पवार गटाने भाजपला डिवचलं आहे. खोके आणि ईडीचा उल्लेख करत पवार गटाने थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भाजपला डिवचणांर ट्विट करण्यात आलं आहे.
Johnyy Johnnu yes papa ?
Eatingh Khoke ? No papa !
Leaving Party ? No papa !
Afraid of ED ? No papa !
Telling Lies ? No papa !
Open your mouth !!! भा..ज.. पा..
असं ट्विट करत भाजपवर निशाणा साधण्यात आला. एवढंच नव्हे तर ‘ बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..!’ असा टोलाही या ट्विटवरून भाजपला मारण्यात आला आहे.
बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! pic.twitter.com/TAHYuF1MQS
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 13, 2024
राऊतांनी केली टीका
दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनीही अशोक चव्हाण आणि भाजपावर टीका केली. अशोक चव्हाण हे स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आदर्श घोटाळा केलेले लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. जनता तुमच्यावर थुंकत आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केलं तसेच भाजपवरही टीका केली.
एवढंच नव्हे तर अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडण्याची, काँग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
काँग्रेसमध्ये अनेक वर्ष घालवलेले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक, तसेच आमदारही त्यांच्यासोबत बाहेर पडले असून आज दुपारीच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह माजी विधान परिषद सदस्य अंमरनाथ राजुरकर यांच्या समवेत नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काँग्रेस पक्ष संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांचा आज भाजप प्रदेश कार्यालय येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश होणार आहे.
आधी मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांसारेख पक्षातील दिग्गज नेते एकामागोमाग पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. काल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. चव्हाणांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची हायकमांडसोबत चर्चाही झाली. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी काही आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. हे डॅमेज कंट्रोल करण्याकरीता कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे आमदारांशी संपर्क साधत आहेत. आता 16, 17 फेब्रुवारीला काँग्रेसचं शिबीर पडणार आहे.