मुंबई : गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवरील एका वेब सिरीजने हाहाकार माजवला. ती वेब सिरीज म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’. ही वेब सिरीज हिंदी वेब सिरीजमधील सर्वात यशस्वी वेब सिरीज ठरली. ‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सीझन अगदी महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबवण्यात आला. त्यामुळे चाहते याचा पुढील सीझन कधी येणार याची वाट पाहात होते. अखेर चाहत्यांच्या प्रतिक्षेवर पूर्णविराम लावत ‘सेक्रेड गेम्स-2’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘सेक्रेड गेम्स-2’चा पहिला भाग येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
‘सेक्रेड गेम्स-2’ ट्रेलर पाहून हे लक्षात येतं की, गेल्या सीझनमधील सर्व अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं या सीझनमध्ये मिळणार आहेत. त्यासोबतच या सीझनमध्ये दोन नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन आणि अभिनेता रणवीर शौरी दिसणार आहेत. तर गेल्या सीझनमधील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये असलेल्या राधिका आप्टे आणि कुब्रा सैत या सीझनमध्ये दिसणार नाहीत.
‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सीझन हा अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र नव्या सीझनमध्ये नीरज घेवान यांनी विक्रमादित्य यांची जागा घेतली आहे.
‘सेक्रेड गेम्स-2’मध्ये या पाच प्रश्नांची उत्तरं मिळणार
1. मुंबईला काय आणि कुणापासून धोका आहे?
‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या सीझनमध्ये गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) सरताज सिंग (सैफ अली खान) ला फोन करतो आणि सांगतो की, ‘25 दिन है तुम्हारे पास… बचा लेना अपने शहर को’. मात्र, संपूर्ण सिरीज पाहूनही मुंबईला काय धोका आहे, या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. नव्या भागात या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे.
2. सर्व मारले जातील तर त्रिवेदी कसा वाचेल?
सर्व मारले जातील… फक्त त्रिवेदी वाचेल, असं गणेश गायतोंडेने सरताज सिंगला फोन करुन सांगितलं होतं. मात्र, पहिलं सीझन संपला तरी त्रिवेदी कसा आणि का वाचेल, याचं उत्तर प्रेक्षकांना सापडलं नाही. नव्या सीझनमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं.
3. गणेश गायतोंडे आणि सरताज सिंगचं कनेक्शन काय?
गणेश गायतोंडे जेव्हा सरताजला फोन करतो, तेव्हा तो दिलबाग सिंगचा मित्र असल्याचं सांगतो. दिलबाग सिंग हे सरताजच्या वडिलांचं नाव आहे. सरताज जेव्हा गणेश गायतोंडेला विचारतो, की तो सरताजच्या वडिलांना कसा ओळखतो? त्यावर गायतोंडें स्पष्ट उत्तर देत नाही. त्यामुळे गणेश गायतोंडे आणि सरताज सिंगमध्ये नेमकं कनेक्शन काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.
4. या संपूर्ण गेमचा मास्टरमाईंड कोण?
पहिल्या सीझनमध्ये अखेरीस असं वाटू लागतं, की हा संपूर्ण गेम गणेश गायतोंडेचा आहे. मात्र, प्रत्यक्षात तसं नसतं. कुणीतरी दुसरा आहे, जो गणेश गायतोंडेपेक्षाही मोठा खेळाडू आहे, असं अनेकदा सिरीज पाहाताना जाणवतं. त्यामुळे या गेमचा मास्टरमाईंड कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर या सीझनमध्ये मिळेल.
5. या सर्व प्रकरणात आणि गणेश गायतोंडेच्या जीवनात गुरुजीची भूमिका काय?
‘सेक्रेड गेम्स’च्या नव्या सीझनमध्ये गुरुजी नेमके काण आहेत आणि त्यांचा गणेश गायतोंडेशी काय संबंध आहे हे स्पष्ट होणार आहे. गेल्या सीझनमध्ये गुरुजी काही सेकंदांसाठी दिसले होते. मात्र, या सीझनमध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी हे गुरुजीच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे गुरुजीच्या भूमिकेत ते प्रेक्षकांना किती प्रभावित करतील हे पाहाणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल.
ट्रेलर :