नवी दिल्ली : भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. जर हे कुस्तीपटू स्वत:च त्यांचे मेडलं गंगानदीत सोडू इच्छित असतील तर मी त्याला मी काय करू शकतो?, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. बृजभूषण सिंह यांनी अटकेच्या मुद्द्यावरही भाष्य केलंय. तसंच युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगकडून भारतीय कुस्तीसंघ निलंबित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे कुस्तीपटू त्यांची मेडल्स् गंगा नदीत सोडायला गेले होते. पण त्यांनी मेडल्स् गंगा नदीत सोडले नाहीत. तर त्या ऐवजी त्यांनी ही मेडल्स् नरेश टिकैत यांनी दिली. तो त्यांचा अधिकार आणि त्यांची भूमिका आहे. याला मी काय करू शकतो, असं बृजभूषण सिंह म्हणाले.
बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरही बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. माझा कार्यकाळ आता संपला आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. लवकरच निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
माझ्या हातात काहीच नाही. माझ्या विरोधात FIR नोंदवण्यात आलाय. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना तपासात मी दोषी आढळलो. तर मला अटक केली जाईल. त्यासाठी मी तयार आहे. मला यात कोणतीच अडचण वाटत नाही, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.
लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत मागच्या महिनाभरापासून कुस्तीपटू राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत. आता हे आंदोलन अधिक आक्रमक झालं आहे.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवसापासून हे आंदोलन अधिक आक्रमक झालंय. नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी 28 मेला या कुस्तीपटूंनी संसदभवन परिसरात महापंचायतीचं आयोजन केलं होतं. जंतर मंतर मैदानावरून हे कुस्तीपटू संसदेच्या दिशेने जात असतानाच त्यांना अडवण्यात आलं. तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. तेव्हा यावेळचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
कुस्तीपटूंनी केलेले आरोप आणि त्यानंतर या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यावर युनाइटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थातच UWW ने नाराजी दर्शवली आहे. भारतीय कुस्तीसंघ निलंबन करण्याचा इशाराही UWW ने दिला आहे. कुस्तीपटूंनी लावलेले आरोप गंभीर आहेत. पण आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटूंना ज्या प्रकारे पोलिसांनी ताब्यात घेतलं ते देखील चिंताजनक आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी, असं UWW चं म्हणणं आहे.