नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अशास्थितीत भारतातील तीन लसीची निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरी कोरोनाची लस बाजारात आल्यानंतरही योग्य काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात ICMRने सांगितलं आहे. कोरोनाची लस आल्यानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत काही निर्बंध लागू राहतील, अशी माहितीही ICMRकडून देण्यात आली आहे. (ICMR appeals for caution even after corona vaccination)
कोरोनाची लस आल्यानंतरही सर्वांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. कारण, कोरोनाची लस ही तुम्हाला फक्त कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकणार आहे. मात्र, वातावरणातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसेल. त्यामुळे मास्क वापरणं गरजेचं असल्याचं मत ICMRचे प्राध्यापक बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे या शहरांचा धावता दौरा केला. अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना लस निर्मितीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी काल घेतला. त्याच दिवशी लखनऊमध्ये किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटीमध्ये एका वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्राध्यापक बलराम भार्गव यांनी नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं आहे.
भारतातील कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी फक्त लस हाच एकमेव उपाय असू शकणार नाही. तर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीबरोबरच संक्रमित व्यक्तीच्या अँटीबॉडीज आणि मास्क हे मुख्य अस्त्र असणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क एखाद्या लसीप्रमाणे काम करेल, असा दावाही भार्गव यांनी केला आहे.
कोरोना लसीच्या निर्मितीबाबत भारतात वेगवान काम सुरु आहे. जुलै 2021 पर्यंत देशातील 30 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्याचं लक्ष्य असल्याची माहितीही भार्गव यांनी दिली आहे. भारतात फक्त आपल्या देशातील नागरिकांसाठीच नाही तर आपल्या शेजारी आणि अन्य राष्ट्रांमधील 60 टक्के लोकांसाठी लसीची निर्मिती सुरु असल्याचा दावाही भार्गव यांनी केला आहे.
ICMR appeals for caution even after corona vaccination