ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर
8 जूनपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि हॉस्पिटॅलिटी सर्विसशी संबंधित ठिकाणं, शॉपिंग मॉल उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे (New Guidelines of Unlock 1).
Follow us on
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Corona virus)नियंत्रणासाठी देशभरात लागू लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून देशभरात 1 जूनपासून अनलॉक 1.0 ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आता त्याच्या पुढील टप्प्यात 8 जूनपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि हॉस्पिटॅलिटी सर्विसशी संबंधित ठिकाणं, शॉपिंग मॉल उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे (New Guidelines of Unlock 1). यासाठी सर्वांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं (SOP) तंतोतंत पालन करावं लागणार आहे. याबाबत गृहमंत्रालयाने आज नियमावली जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे गृह मंत्रालयाच्या नवीन नियमावलीनुसार इमारतीत 1 किंवा 2 कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत 48 तासांसाठी लॉक होणार नाही. याऐवजी संबंधित कोरोना रुग्ण जेथे राहत होता त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केलं जाईल. गृह मंत्रालयाने म्हटलं आहे, “कोणत्याही ऑफिस किंवा राहण्याच्या ठिकाणी रुग्ण आढळल्यास त्या इमारती ऐवजी केवळ इमारतीचा तो भाग (खोली) निर्जंतुकीकरणासाठी लॉक करण्यात येईल. त्या दरम्यान, सर्व कर्मचारी घरुन काम करतील.
ऑफिस
ऑफिसच्या एन्ट्री गेटवर सॅनिटायजर डिस्पेंसर असणं आवश्यक असेल. तेथेच तापमान मोजण्याची सुविधा देखील असेल.
ज्यांना कोरोनाची लक्षणं नाही, त्यांनाच ऑफिसमध्ये येण्याची परवानगी असेल.
कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांना याची कल्पना द्यावी लागेल.
संबंधित भाग कंटेनमेंट झोनमधून वगळला जात नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्तीला ऑफिसमध्ये येण्याची परवानगी नसेल.
गाडी चालकांना देखील शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं पालन करावं लागेल.
कार्यलयातील वरिष्ठ दळणवळणाची व्यवस्था करताना कंटेनमेंट झोनमधील चालक गाडी चालवणार नाही याची खबरदारी घेतील.
धार्मिक स्थळं
एन्ट्री गेटवर सॅनिटायजर डिस्पेंसर असणं आवश्यक असेल. तेथेच तापमान मोजण्याची सुविधा देखील असेल.
मास्क घालणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
पोस्टरच्या माध्यमातून लोकांना कोरोनाविषयी जागरुक केलं जाईल आणि ऑडियो-व्हिडीयो मेसेज देखील दिले जातील.
लोक आपले चप्पल-बूट आपल्या गाडीतच ठेवतील. आवश्यक असल्यास वेगळ्या स्लॉटमध्ये ठेवले जातील.
पार्किंग आणि मंदिर परिसरात शारीरिक अंतराचं पालन केलं जाईल.
आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन होईल.
रेस्टॉरन्ट
रेस्टॉरन्टमध्ये येणाऱ्यांना एकमेकांपासून 6 फूटाचं अंतर ठेवून बसावं लागेल.
विना मास्क कुणालाही रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश मिळणार नाही.
गाईडलाईननुसार रेस्टॉरन्टमध्ये वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी जाऊ नये.
रेस्टॉरन्टमध्ये जितका वेळ थांबाल तितक्या वेळेत थोड्या वेळाने हात स्वच्छ करत राहणं आवश्यक असेल.
हात खराब नसतील तरी काही वेळेनंतर हात धुवावे लागतील.
रेस्टॉरन्टमधील कर्मचाऱ्यांना देखील हात आणि तोंड झाकूनच काम करावे लागेल.
शेफ असो की वेटर किंवा इतर कर्मचारी सर्वांना नियम पाळावे लागतील.
हॉटेल
हॉटलमध्ये येणाऱ्यांच्या प्रवासाची माहिती, मेडिकल कंडिशन याची माहिती घेण्यासाठी रिसेप्शनवर एक फॉर्म भरावा लागेल.
अधिकाधिक काम ऑनलाइन होईल.
ग्राहकांचं सामान नेण्याआधी त्याला निर्जंतुकीकरण केलं जाईल.
वरिष्ठ नागरिक, गर्भवती महिलांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेतली जाईल.
हॉटलच्या रेस्टॉरंटमध्ये शारीरिक अंतराचे नियम पाळले जातील.