मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा चुना लावून पसार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागजवळील अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश जारी केल्याचे राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. याबाबत रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी हा बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. हिरा व्यापारी नीरव मोदी याचा हा अनधिकृत बंगला अलिबागजवळील किहीमच्या समुद्रकिनारी आहे. वकील पी बी काकडे यांनी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश एमएस कार्णिक यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, राज्य सरकार आणि तटीय क्षेत्रांच्या नियमांचे उल्लंघन करत निर्माण केलेल्या 58 खासगी संपत्तींना पाडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीमध्ये तटीय क्षेत्रात अवैधरित्या आणि तटीय क्षेत्रांच्या नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आलेल्या खासगी संपत्तींवरील करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. त्यावर सरकारने न्यायालयात सादर केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, नीरव मोदी याचा अलिबागजवळील अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
प्रसिद्ध हिरा व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घातला होता. त्यानंतर त्याने विदेशात पळ काढला.
मोदीचा जवळपास 30 हजार चौरस फुटाचे बांधकाम असलेला हा बंगला सध्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केला आहे. याला पाडण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच हा बंगला पाडण्यात येणार आहे. मात्र आज यावर कारवाई होण्याची शक्यता नाही. या प्रकरणी पुढील सुणावणी 20 डिसेंबरला होणार आहे.