नराधमांना फाशी! लेकीच्या फोटोला उराशी कवटाळून निर्भयाची आई म्हणते…

| Updated on: Mar 20, 2020 | 7:08 AM

निर्भयाच्या दोषींना फाशी झाल्याचं वृत्त बाहेर येताच तुरुंग परिसरात जमलेले सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. (Nirbhaya Mother hugged Daughter's picture)

नराधमांना फाशी! लेकीच्या फोटोला उराशी कवटाळून निर्भयाची आई म्हणते...
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही दोषींना आज (20 मार्च 2020) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर निर्भयाच्या आई आशादेवी यांनी लेकीच्या फोटोला गच्च मिठी मारत ‘शेवटी तुला न्याय मिळाला’ असे उद्गार काढले. (Nirbhaya Mother hugged Daughter’s picture)

निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर सात वर्ष तीन महिने तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना तिहार जेलमधील तीन क्रमांकाच्या तुरुंगात फासावर लटकवण्यात आले.

निर्भयाच्या आई आशादेवी यांनीही समाधानाची भावना व्यक्त केली. ‘शेवटी त्यांना फाशी देण्यात आली. हा एक दीर्घकाळ चाललेला संघर्ष होता. आज आम्हाला न्याय मिळाला, हा दिवस देशातील मुलींना समर्पित आहे. मी न्यायपालिका व सरकार यांचे आभार मानते.’ असं आशादेवी म्हणाल्या.

‘निर्भया’ला अखेर न्याय, सूर्योदयापूर्वी नराधमांचा अस्त, चारही दोषींना फाशी

‘आमची मुलगी आता या जगात नाही आणि ती परतही येणार नाही. ती आम्हाला सोडून गेल्यानंतर आम्ही हा लढा सुरु केला होता, हा संघर्ष तिच्यासाठी होता पण आम्ही आमच्या लेकींसाठी भविष्यात हा लढा सुरु ठेवू’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आशादेवी यांनी विजय चिन्ह दाखवत बहीण सुनीता देवी आणि वकील सीमा कुशवाह यांना मिठी मारली.

यावेळी तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फाशीचं वृत्त बाहेर येताच तुरुंग परिसरात जमलेले सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांनी एकच जल्लोष केला. मिठाई वाटून सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.

निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केलं. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. (Nirbhaya Mother hugged Daughter’s picture)