नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारमण यांनी कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात (Corporate Tax) कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या करात घट होऊन आता 17.1 टक्के झाला आहे. सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. आर्थिक मंदीतून (Economic Recession) सावरण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सीतारमण यांनी नमूद केलं.
सीतारमण यांनी जीएसटीच्या (GST) बैठकीआधीच या निर्णयाची घोषणा केली. भांडवली नफ्यावरील अधिभार रद्द करण्यात आला आहे. देशांतर्गत निर्मिती कंपन्यांसाठीचा कर 22 टक्के केला आहे. यात सेसचा समावेश केल्यानंतर 25.17 टक्के होईल. या निर्णयामुळे कंपन्यांच्या हातात जास्त पैसा राहील आणि कर्मचारी कपात होणार नाही, असे मत सीतारमण यांनी व्यक्त केलं आहे. संबंधित आदेशाच्या अध्यादेशाला मंजुरी मिळाली आहे.
अर्थमंत्र्यांच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्याप्रमाणेच अर्थमंत्री सीतारमण यांच्या करातील कपातीच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली.
शेअर बाजाराचा निर्देशांक 1600 अंकांनी वाढला. यासह सेंसेक्सने 37 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टीने देखील 11 हजारांच्या टप्प्याला स्पर्श केला. सेंसेक्सच्या सर्व 30 शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली.