नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामात कमिशन खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार, खासदांची चौकशी होण्याची शक्यता आहे (CBI complaint of Nitin Gadkari). केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात थेट सीबीआयला पत्र लिहिलंय. गडकरींच्या या पत्रात 19 हून अधिक लोकप्रतिनिधींच्या नावाचा समावेश असल्याचीही माहिती सांगितली जात आहे. त्यामुळं ठेकेदारांकडून मलिदा खाणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत (CBI complaint of Nitin Gadkari).
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच काही आमदार खासदारांच्या कमिशनखोरीबद्दल वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, “आमच्याकडे काम सुरु झालं की आमदार आणि खासदार कॉन्ट्रॅक्टरला म्हणतात काम नंतर सुरु कर आधी आम्हाला भेट. हे दुसरीकडे नाही, मराठवाड्यात सुरु आहे.” यातून गडकरी यांनी मराठवाड्यातील आमदार आणि खासदारांच्या कमिशनखोरीवर बोट ठेवलं होतं. आता त्यांनी सीबीआयला दिलेल्या पत्रामुळे गडकरी यांनी आपला मोर्चा कमिशनखोर लोकप्रतिनिधींकडे वळवल्याचं दिसत आहे.
नितीन गडकरी यांनी सीबीआयला लिहिलेल्या या पत्रात राज्यातील 12 हून अधिक आमदार आणि 7 हून अधिक खासदारांच्या नावाचा समावेश आहे. 12 जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये बोलतानाच, गडकरींनी लोकप्रतिनिधींकडून ठेकेदारांच्या होणाऱ्या अडवणुकीचा गौप्यस्फोट केला होता.
गडकरींच्या या दाव्यानंतर सर्वत्र हे कमिशन बहाद्दर लोकप्रतिनिधी कोण? अशी चर्चा सुरु झालीय. त्यानंतर आता थेट गडकरींनी सीबीआयलाच पत्र लिहिलंय.. त्यामुळं आता रस्ता कामात मलिदा खाणाऱ्या आणि ठेकेदारांना त्रास देणाऱ्या आमदार, खासदारांचे धाबे दणाणले आहेत.