नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधांची बरीच चर्चा होत असते. मात्र आता या सर्व चर्चांवर नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधानपदाबाबतही भाष्य केलं आहे. नितीन गडकरी यांच्या नावाची कायम पंतप्रधानपदासाठी चर्चा होत असते, त्याबद्दल विविध अटकळीही बांधल्या जातात. मात्र आता गडकरी यांनी या विषयावरही भाष्य करत पंतप्रधानपदाबाबत रोखठोक मत व्यक्त केलं. ‘ मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीही नव्हतो. मी आज जो काही आहे, तसा ( त्या परिस्थितीत) मी संतुष्ट आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी दृढ विश्वासाने काम करतो, ‘ असं स्पष्ट मत नितीन गडकरींनी मांडलं. एका वृत्तपत्राल दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधानबाबत स्पष्ट भाष्य केलं.
राजकारणात करिअर बनवण्यासाठी आलेलो नाही
या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयावर दिलखुलासपणे उत्तर दिली. कोणत्याही मतभेदाच्या बातम्यांनाही त्यांनी त्यांच्या भाष्यातून पूर्णविराम दिला. मी राजकारणात करिअर बनवण्यासाठी आलेलो नाही. मी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि संघ स्वयंसेवक राहणे पसंत करतो, असे ते म्हणाले. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, हिशोब तपासत बसणारा नेता मी नाही.
मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ , गडकरींना विश्वास
सबका साथ सबका विकास यावर माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे अतिशय उत्तम काम करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
फडणवीसांसोबत कसं आहे नातं ?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये काही मतभेद याहेत, काही मुद्यांवर आमचं एकमत नाही अशा अफवा पसरवल्या जातात. फडवणीस यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मी त्यांच्या वडिलांची भेट घेऊन चर्चा केली होती. जेव्हा एकाच क्षेत्रात दोन मोठे लोक असतील तर अशा अफवा पसरवल्या जातात. मी अशा प्रकरणांमध्ये पडत नाही. माझी याबाबत कोणती तक्रार देखील नसते. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील माझा सल्ला घेतात. फायदा-तोट्याचा विचार करून निर्णय घ्या, असंच मी त्यांना सांगतो, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं