नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या चहूबाजूंच्या कोंडीसाठी भारत कसोशीने तयारी करत आहे. यामध्ये भारतला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने बुधवारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत दाखल केला. एकीकडे ही पावलं उचलली जात असताना, तिकडे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. भारत-पाकिस्तानमध्ये सध्या वाढलेल्या तणावाबाबत रात्री उशिरा दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली.
अमेरिकेनेही दहशतवादाविरोधात पावलं उचलण्याचा पवित्रा घेतला आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका भारतासोबत आहे, असं त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं.
Sources: NSA Ajit Doval and US Secretary of State Mike Pompeo had a telephonic conversation late last night. Pompeo said that the US supported India’s decision to take action against JeM terror camp on Pakistani soil pic.twitter.com/9u5jx8GE9X
— ANI (@ANI) February 28, 2019
अजित डोभाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांना भारताने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदवर केलेल्या एअर स्ट्राईकबाबत माहिती दिली. त्यानंतर पॉम्पियो यांनी दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका भारतासोबत असल्याचं सांगितलं.
पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी
भारताच्या एअर स्ट्राईकने घाबरलेल्या पाकिस्तानवर कूटनीतीचा वर्षाव होत आहे. भारताने जगभरातून पाकिस्तानवर दबाव आणला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सौदी अरेबियाला रवाना झाल्या आहेत. तिथे पाकिस्तानच्या दहशतवादाचा हिशेब त्या मांडतील.
भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात
पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. यामध्ये जवळपास साडेतीनशे दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्ट्राईकमुळे पाकिस्तानची चांगलीच भांबेरी उडाली. यांनंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत त्यांची विमानं घुसवली, मात्र भारताने त्यांचं एक विमान हवेतच उडवलं.
दरम्यान, भारतीय वायूसेनेचा एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारताने जेनिव्हा कराराचा दाखला देत, भारतीय पायलटला परत पाठवण्यास पाकिस्तानला बजावलं आहे.
पाकिस्तानचा दुटप्पीपणा
एकीकडे भारताला चर्चेचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले आहे. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, तोफांचा बेसुमार मारा आणि गोळीबार केला. भारतीय लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. हा प्रकार जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीत सकाळी 6 ते 7 असा सुमारे एक तास सुरू होता. दरम्यान, सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.