नवी दिल्ली : दिल्लीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल स्वतः हिंसाचारग्रस्त भागात पाहणी करत आहेत. यावेळी अनेक पीडितांनी त्यांच्यासमोर आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी एका महाविद्यालयीन युवतीने देखील आपलं घरं-दुकान जाळल्याचं सांगत पोलीस त्यांचं काम करत नसल्याची हतबलता व्यक्त केली. यावर अजित डोभाल यांनी पीडित विद्यार्थीनीला सुरक्षेची हमी देत शब्द दिला (Ajit Dobhal on Delhi violence). यावेळी अजित डोभाल यांना पीडितांच्या आक्रोशालाही सामोरं जावं लागलं.
पीडित विद्यार्थीनी म्हणाली, “सर आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही. आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही. येथे प्रचंड भीती वाटत आहे. मी विद्यार्थी आहे आणि मला शिकण्यासाठी कॉलेजलाही जाता येत नाहीये. आमचे भाऊ आमचं संरक्षण करत आहेत. याठिकाणी आमची दुकानं जाळण्यात आली आहेत. आमची घरं जाळली गेली आहेत.”
पीडित विद्यार्थीनीच्या व्यथेनंतर अजित डोभाल म्हणाले, “तुम्हाला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमची सुरक्षा ही सरकारची, पोलिसांची आणि आमची जबाबदारी आहे. प्रत्येकजण तुमच्यासोबत आहे.” यावर संबंधित विद्यार्थीनीने पोलीस देखील त्यांचं काम करत नसल्याची तक्रार केली. तसेच या परिस्थितीवर ठोस पावलं उचलण्याची विनंती केली.
“अमित शाह आणि भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर हा हिंसाचार”
हिंसेत होरपळणाऱ्या पीडितांनी अजित डोभाल यांच्यासमोरच हा हिंसाचार अमित शाह आणि भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर झाल्याचा गंभीर आरोपही केला. यावेळी संतप्त पीडितांनी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’, ‘अजित डोभाल वापस जाओ’, ‘दिल्ली पोलीस हाय हाय’च्या घोषणाही दिल्या.
“गृहमंत्री अमित शाह पाहणी करण्यासाठी का आले नाहीत?”
माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी अजित डोभाल यांना स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शाह हिंसाचार प्रभावित भागात पाहणी करण्यासाठी का आले नाहीत? असा थेट सवाल केला. यावर अजित डोभाल यांनी आम्ही आलो आहोत. त्यांनी आम्हाला पाठवलं आहे, असं उत्तर दिलं. अजित डोभाल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानुसारच आम्ही येथे पाहणी करण्यासाठी आलो आहोत. त्यानुसार येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येथे नक्कीच शांतता प्रस्थापित होईल. जे झालं ते झालं, मात्र, आता यापुढे काहीही होणार नाही. नागरिक ज्या प्रकारे याला प्रतिसाद देत आहेत त्यावरुन मला विश्वास आहे की येथे पूर्णपणे शांतता राहिल.”
लोकांमध्ये एकतेची भावना आहे. त्यांच्यात कोणतंही शत्रुत्व नाही. दोन-चार गुन्हेगारच असं काम करत असतात. त्यांना वेगळं करण्याचं काम सुरु आहे. दोन्ही समुदायांसोबत अत्याचार झाला आहे. या ठिकाणी पोलीस तैनात असून ते सतर्क आहेत. ते आपलं काम करत आहेत. पोलिसांची जबाबदारी आहे की प्रत्येकाला सुरक्षित ठेवलं जाईल, असंही डोभाल यांनी नमूद केलं.
“अडचणी वाढवण्याऐवजी त्या सोडवण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे”
अजित डोभाल म्हणाले, “प्रत्येक नागरिक जो आपल्या देशावर प्रेम करतो तो आपल्या समाजावरही प्रेम करतो. तो आपल्या शेजाऱ्यावर देखील प्रेम करतो आणि आपल्या घरावरही प्रेम करतो. त्यांना प्रेम करायचं असेल तर त्यांनी सर्वांशी एकतेच्या आणि सहानुभुतीच्या भावनेने, समरसतेच्या भावनेने जगण्याचा प्रयत्न करायला हवा. एकमेकांच्या अडचणी वाढवण्याऐवजी त्या सोडवण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. या भागात सर्वाधिक तणाव होता आणि गोळीबार देखील झाला होता. मात्र, आज येथे अगदी शांतता असल्याचं मी पाहतो आहे. सर्व लोक आम्हाला शांतता हवी असं सांगत आहेत.”
Ajit Dobhal on Delhi violence