नवी दिल्ली : देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती असून 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून उमटला आहे. कोणत्याही राज्य सरकारने केंद्राआधी लॉकडाऊनची मुदत वाढवण्याचा निर्णय अद्याप घेतला नव्हता. परंतु ओदिशा सरकारने राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. (Odisha to extend lockdown till April end)
बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या राज्यातील लॉकडाऊन आणखी 16 दिवसांनी वाढवले आहे. त्यामुळे ओदिशा हे 14 एप्रिलपुढे लॉकडाऊन वाढवणारे पहिले राज्य ठरले आहे.
नवीन पटनायक यांनी केंद्राला 30 एप्रिलपर्यंत रेल्वे आणि हवाई सेवा सुरु न करण्याची विनंती केली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थाही 17 जूनपर्यंत बंद राहणार आहेत.
Odisha CM Naveen Patnaik has requested the Centre not to start train and air services till April 30th; Educational institutions in the state to remain closed till June 17th. https://t.co/z5R4a8Cyap
— ANI (@ANI) April 9, 2020
नरेंद्र मोदी शनिवार 11 एप्रिलला पुन्हा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशव्यापी लॉकडाऊनच्या मुदतवाढीचा फैसला याच दिवशी होण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वीच पटनायक यांची मोदींशी चर्चा झाली होती. नवीन पटनायक हे प्रसिद्ध कवी-लेखक असून गेल्या 20 वर्षांपासून ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत.
Odisha to extend lockdown till April 30; schools to remain closed till June 17: CM Naveen Patnaik
— Press Trust of India (@PTI_News) April 9, 2020
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मंगळवारी मृत्यू झालेला 72 वर्षीय रुग्ण हा ओडिशातील पहिला ‘कोरोना’बळी होता. राज्यात एकूण 42 कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत ओदिशामधील कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याने आता राज्यात किती दिवस लॉकडाऊन वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. मात्र लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
तूर्तास तरी 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तसं सूतोवाच केलं आहेच. कोरोनाचा जिथून फैलाव झाला, त्या चीनमधील वुहानमध्ये झालेल्या 76 दिवसांच्या लॉकडाऊनचा दाखला कालच उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी किती ताणावे लागेल, याची चुणूक त्यांनी दाखवली. (Odisha to extend lockdown till April end)