दिल्ली : राष्ट्रीय कामधेनू आयोगाने (Rashtriya Kamdhenu Aayog) गायींच्या शेणापासून रेडिएशन कमी करणारी चीप विकसित केल्याचा दावा केल्यानंतर, आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. त्यातच देशातील जवळपास 600 वैज्ञानिक आणि विज्ञानाच्या शिक्षकांनी हा दावा सिद्ध करण्याचे आवाहन कामधेनू आयोगाला केले आहे. (On Rashtriya Kamdhenu Aayog claim of Radiation chips from cows dung 600 scientists aksed for evidence)
राष्ट्रीय कामधेनू आयोगाने मागच्या आठवड्यात गायींच्या शेणापासून एक चीप विकसित केल्याचं सांगितलं होतं. या चीपमुळे मोबाईलमधून निघणारी रेडिएशन्स कमी होत असल्याचा दावा आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर आता देशभरात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यातच देशातील जवळपास 600 वैज्ञानिक आणि शिक्षकांनी आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून त्यांचा दावा सिद्ध करण्यास करण्याचे आवाहन केले आहे.
“आपण जो दावा केला आहे, तो सिद्ध करा. त्यासाठी योग्य पुरावे द्या. तसेच तुमच्या दाव्यासंबंधीचे वैज्ञानिक प्रयोग कधी आणि कुठे झाले? आपण केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष कुठे प्रकाशित झाले? हेही सांगा.” असे वैज्ञानिक आणि शिक्षकांनी कामधेनू आयोगाचे अध्यक्ष कथिरिया यांना विचारलं आहे.
काय आहे राष्ट्रीय कामधेनू आयोगाचा दावा ?
राष्ट्रीय कामधेनू आयोगाने 12 ऑक्टोबरला गायींच्या शेणापासून रेडिएशन कमी करणारी चीप तयार केल्याचा दावा केला. या चीपमुळे मोबाईलमधून निघणारे हानिकारक रेडिएशन्स कमी होण्यास मदत होते. गायीच्या शेणात अॅन्टी रेडिएशन तत्त्व असून वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते सिद्ध झालं आहे, असा दावा आयोगाच्या अध्यक्षांनी केला.
राष्ट्रीय कामधेनू आयोग काय आहे?
भाजप खासदार कथिरिया हे राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष आहेत. या आयोगाची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली. आयोगाद्वारे शेतकरी तसेच पशुपालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. हा आयोग मत्स्य, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येतो. गायींचं संरक्षण, संवर्धन आणि विकास हा या आयोगाचा मुख्य उद्देश आहे.
संबंंधित बातम्या :
भारतात फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल; केंद्रीय समितीचे भाकीत
एक नेता ‘टंच माल’, तर दुसरा ‘आयटम’ म्हणतोय, गांधी कुटुंब आता गप्प का? : स्मृती इराणी
‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल
(On Rashtriya Kamdhenu Aayog claim of Radiation chips from cows dung 600 scientists aksed for evidence)