नवी दिल्ली : देशात डिजीटल माध्यामातून पैसे ट्रान्सफर करताना अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकरण वारंवार समोर येतात. याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016 पासून 2019 पर्यंत (गेल्या तीन वर्षात) जवळपास 1 लाख 76 हजार 423 लोकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तब्बल 6 अब्ज 96 कोटी 35 लाख रुपयांचा चुना लागला आहे. माहिती कायद्यातंर्गत आरबीआयने ही धक्कादायक माहिती दिली आहे.
या आकडेवारीमुळे देशात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या लोकांना रोखणं सरकारला दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘दैनिक जागरण’ या हिंदी वृत्तपत्राने याबाबतची माहिती मागवली होती. वित्त मंत्रालयाने त्यांना याबाबत माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात 87 हजार 956 लोकांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तर 88 हजार 467 लोकांनी फसवणूक झाल्यानंतर त्यांनी केवळ संबंधित बँकेला याबाबत तक्रार केली. मात्र त्यानंतर यापुढे कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही.
तर 206-17 या वर्षात देशभरात 4 हजार 559 लोक ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झालेत. यातील 3 हजार 187 लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2017-18 या वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या आकडेवारीत तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2017-18 वर्षात 72 हजार 205 लोकांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ 37 हजार 414 लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तर इतर 34 हजार 791 लोकांनी या प्रकरणी बँकेला सूचना दिल्या आहेत.
दरम्यान आरबीआयने ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांची दोन विभागात विभागणी केली आहे. एका विभागात 1 लाखापेक्षा अधिक आणि दुसऱ्या विभागात 1 लाखाहून कमी पैशांची फसवणुकीचा समावेश आहे. यानुसार ही आकडेवारी जाहीर केली आहे.
देशात सध्या टेक्नॉलॉजीचा वाढत्या वापरामुळे कोणत्याही व्यक्ती घरबसल्या पैसे पाठवणे सहज शक्य झाले आहे. BHIM, UPI, गूगल पे, NEFT/RTGS, Paytm यासारख्या विविध डिजीटल वॉलेटचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेकजण करतात. मात्र यामुळे अनेकांची फसवणूक होत असल्याची प्रकरण वारंवार समोर येतात. त्यातच आरबीआयने दिलेली आकडेवारी ही धक्कादायक स्वरुपाची आहे. या आकडेवारीतून सरकारला ऑनलाईनच्या माध्यमातून होणारी फसवणुकीची प्रकरण रोखणे आव्हान बनल्याचे समोर येत आहे.