नागपूर : यावर्षीचा राज्यातील दुष्काळ आजपर्यंतचा सर्वात भीषण दुष्काळ असल्याचे सांगितलं गेलं. अखेर कसाबसा हा दुष्काळी उन्हाळा लोटत पावसाळ्याला सुरुवात झाली. मात्र, पावसाळ्याचे जवळपास 50 दिवस लोटलेय, तरिही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात धरणं भर पावसाळ्यातंही तळालाच आहेत. राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत केवळ 24 टक्केच पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 20 टक्के कमी आहे. त्यामुळे हीच स्थिता राहिली पुढील दुष्काळ यावर्षीच्या कितीतरी पट भयानक असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
पावसाचं प्रमाण आणि धरणातील पाण्याचा साठा याबाबत सर्वात विदारक स्थिती मराठवाड्याची आहे. औरंगाबाद विभागातील धरणात सध्या 0.8 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. विदर्भाची परिस्थितीही काही वेगळी नाही. अपुऱ्या पावसामुळे विदर्भातील धरणांमध्ये सध्या फक्त 8 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. विदर्भातील अनेक धरणं तळाला लागली आहेत. गोसीखुर्दसारखं राष्ट्रीय धरणं त्यापैकीच एक आहे. या धरणाची सिंचन क्षमता साधारण 2 लाख हेक्टरच्या आसपास आहे. या गोसीखुर्द धरणात सध्या फक्त 1 टक्का पाणीसाठा आहे.
विभाग धरणं सध्याचा पाणीसाठा गेल्यावर्षीचा पाणीसाठा
अमरावती 446 08 टक्के 30 टक्के
औरंगाबाद 946 0.8 टक्के 15 टक्के
कोकण 176 66 टक्के 83 टक्के
नागपूर 384 08 टक्के 34 टक्के
नाशिक 571 19 टक्के 34 टक्के
पुणे 726 34 टक्के 60 टक्के
1 जून ते 30 सप्टेंबर म्हणजे 4 महिने देशात पावसाळ्याचा हंगाम असतो. यापैकी 20 दिवस म्हणजे दीड महिन्यांपेक्षा जास्त पावसाचे दिवस लोटले. आता उरलेल्या अडीच महिन्यात सरासरीइतका पाऊस आला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यावरील दुष्काळाच्या संकटातून कसा मार्ग निघणार? त्यासाठी सरकार किती तयार आहे? दुरगामी विचार करुन आत्ताच काही पावले उचलण्यात आली आहेत का? असे अनेक प्रश्नं अनुत्तरीत आहेत.