उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे आणखी एक उदहरण समोर आले आहे. किम जोंग उन हे उत्तर कोरियाच्या पवित्र ‘पाकटू माउंटन ब्लडलाइन’चे सदस्य आहेत. कोरियन द्वीपकल्पातील सर्वोच्च पर्वताच्या नावावरून हा शब्द उत्तर कोरियाच्या सत्ताधारी राजवंशासाठी वापरला जातो. जेव्हा किम जोंग उन सत्तेवर आले तेव्हा अनेक विश्लेषकांना त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता असल्याची भीती वावत होती. पण, आता एका दशकानंतर किम जोंग उन यांनी विश्लेषकांची भीती निरर्थक ठरवित स्वतःचे एक हुकुमशहा असे व्यक्तिमत्त्व बनवले आहे.
गेली अनेक दशके उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. 1953 नंतर किम जोंग यांच्या रुपाने उत्तर कोरियाचा राजकीय नेता दक्षिण कोरियामध्ये गेला. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांच्याबरोबर आपल्या शिष्टमंडळाच्या साथीने विविध विषयांवर चर्चा केली. यामुळे गेली सात दशके चाललेले युद्ध संपुष्टात आले. नुकतीच या देशांनी शांततेचा काळ आता सुरु झाल्याचे द्योतक असणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली होती. परंतु, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच किम जोंग यांनी दक्षिण कोरियाला आपला शत्रू घोषित केले होते.
किम जोंग यांच्या सरकारने त्यांच्या देशात दक्षिण कोरियाचे नाटक आणि चित्रपट पाहण्यास बंदी घातली आहे. उत्तर कोरियामध्ये जपानी, कोरियन आणि अमेरिकन ड्रामा पाहण्यावर बंदी आहे. डिसेंबर 2020 मध्ये याबाबत कायदा लागू केला आहे. ज्या अंतर्गत फाशीची शिक्षा आणि पाहणाऱ्यांना 15 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. या कायद्याच्या कक्षेत पुस्तके, गाणी आणि चित्रे यांचाही समावेश आहे.
गेल्या आठवड्यामध्ये उत्तर कोरियाच्या 30 विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियामध्ये बनवलेली नाटके ज्यांना कोरियन ड्रामा किंवा के नाटक असेही म्हणतात ती पाहिली होती. जानेवारी महिन्यामध्ये उत्तर कोरियामध्ये रहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांकडे दक्षिण कोरियन व्हिडिओ सापडला. त्यानंतर त्या लहान मुलांना 12 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा 30 अल्पवयीन मुलांकडे दक्षिण कोरियन व्हिडिओ असणारे पेन ड्राईव्ह सापडले आहेत.
विद्यार्थ्यांकडे सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये अनेक दक्षिण कोरियन नाटके आहेत. पाले दुख कमी करण्यासाठी त्यांनी ही नाटके पाहिली होती. मात्र, उत्तर कोरियाच्या कायद्यानुसार हा गुन्हा असल्यामुळे त्या अल्पवयीन मुलांना हे नाटक पाहण्याची शिक्षा म्हणून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे पेन ड्राइव्ह गेल्या महिन्यात फुग्यांद्वारे बेकायदेशीरपणे उत्तर कोरियाला पाठवण्यात आले होते अशी माहिती सरकारला मिळाली. त्या मुलांचे वय 19 वर्षांपेक्षा कमी असल्याची महिती येथील प्रसारमाध्यमांनी दिली आहे.