महेश पवार, मुंबई | 12 मार्च 2024 : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्यात लोकसभा निवडणूक 2024 चे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस पक्षाला चार मुख्यमंत्री देणाऱ्या मराठवाड्यात भाजपने तगड्या नेत्याला सोबत घेऊन कमळ फुलवण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसचा हात धरणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव गट) पाठिंब्याची खरी परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासारख्या तगड्या नेत्याला भाजपात घेऊन आणि त्यापाठोपाठ राज्यसभेवर पाठवून भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक म्हणजे अशोक चव्हाण यांना घेऊन कॉंग्रेसला कमकुवत करणे आणि त्यांच्याच साथीने मराठवाड्यात पक्ष वाढविणे.
एकेकाळी हैदराबाद निजामाच्या संस्थानाचा भाग असलेल्या मराठवाड्याशी काँग्रेसचे फार जुने संबंध आहेत. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण स्वतः तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे ही दोनदा मुख्यमंत्री होते. एकाच कुटुंबातील या दोन नेत्यांशिवाय विलासराव देशमुख यांच्यासारखे दिग्गज लोकप्रिय नेतेही मराठवाड्यातीलच होते. ते ही दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. आणखी एक मुख्यमंत्री म्हणजे शिवाजीराव निलंगेकर हे देखील मराठवाड्यातीलच. नेत्यांची ही मालिका पाहिल्यास येथे काँग्रेस किती मजबूत होती हे समजू शकते.
राज्याला चार मुख्यमंत्री देणाऱ्या मराठवाड्यात काँग्रेसच्या ताकदीचा सहज अंदाज लावता येतो. लोकसभेच्या आठ जागा असलेल्या मराठवाड्यात 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीने एकत्र काम केले. त्यामुळे या भूमीवर कधी नव्हे ते ‘कमळ’ फुलू लागले आणि शिवसेनेचा बाण योग्य निशाण्यावर लागला.
1995 मध्ये शिवसेना-भाजपने राज्यात संयुक्त सरकार स्थापन केले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे त्याकाळी मराठवाड्यातील राजकारणाच्या शिखरावर होते. ते उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेनेही येथे अस्तित्व वाढवण्यास सुरुवात केली. 2009 च्या निवडणुका आल्या. तोपर्यंत भाजप आणि शिवसेनेने लोकसभा जागांबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मागे टाकण्यास सुरवात केली. 2009 च्या निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी शिवसेनेने तीन तर भाजपने दोन जागा जिंकल्या.
2014 च्या निवडणुकीत देशात मोदी लाट होती. मात्र, या लाटेतही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभेमधून पत्नी अमिता आणि शेजारच्या हिंगोलीमधून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नेते राजीव सातव या जागा जिंकून आणल्या. या दोन जागा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रसला अन्य कुठलीही जागा जिंकता आली नाही. उर्वरित सहा जागांपैकी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या.
2019 मध्ये मात्र कॉंग्रेसची मराठवाड्यात जबरदस्त पीछेहाट झाली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. एकही जागा जिंकत आली नाही. तर, शिवसेनेने तीन जागा कायम ठेवल्या. छत्रपती संभाजी महाराज नगरची जागा एआयएमआयएमकडे गेली. आणि भाजपने चार जागा जिंकल्या.
मात्र, आता मराठवाड्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना (शिंदे गट) आता भाजपसोबत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलाय. कमकुवत झालेल्या काँग्रेसचा हात शिवसेनेच्या ठाकरे गटाने धरला आहे. मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिवचे खासदार ठाकरे यांच्यासोबत आहेत. तर, हिंगोलीचे खासदार शिंदे यांच्यासोबत आहेत. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच मराठवाड्यात एका मोठ्या सभेला संबोधित करून निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. भाजपला याचा फायदा केवळ मराठवाड्यातच नाही तर शेजारील राज्य तेलंगणामधील लोकसभेच्या अनेक जागांवर होऊ शकतो. चव्हाण यांच्यासोबत सध्या तरी विधान परिषदेतील केवळ एकच आमदार सोबत गेल आहेत. मात्र, विधानसभा सदस्यांपैकी सुमारे दोन डझन आमदारही चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहेत. परंतु, गेल्या तीन निवडणुकांमध्ये प्रत्येकी तीन जागा जिंकणारी शिवसेना या वेळी मतविभाजनानंतर काँग्रेसच्या संगतीत त्याच जागांवर किती जागा जिंकू शकते, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.