उस्मानाबाद : कोणी आकाशात, तर कोणी पाण्यात विवाह केल्याचे अनेक उदाहरणे आपण आजवर ऐकली असतील. मात्र मुक्या जनावरांसह मान्यवरांच्या साक्षीने उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील आई चारा छावणीत शेतकरी कुटुंबातील दोन जोडप्यांचा एक वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. चारा छावणीतील या विवाह सोहळ्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार मिळालाय.
दुष्काळ हा माणसाच्या जीवावर उठलाय. याच दुष्काळाने घरादारातील मुलीची लग्न होत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या गळ्याभोवती मृत्यूचा फास अवळत जीवनयात्रा संपवत असल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तेरमधील आई संस्था आणि श्रद्धा चारा छावणी पुढे सरसावली. दुष्काळात गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी चक्क चारा छावणीवरच उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन मुलीचा विवाह लावून दिला. दुष्काळाच्या भीषण स्तिथीत डोळ्याला आणि मनाला आनंद देणाऱ्या चारा छावणीवरील विवाह सोहळा पार पडला.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील निकिता बाळू देडे आणि कळंब येथील गणेश लहू गवळी यांचा, तर भंडारवाडी येथील सोनाली जोतीराम एडके आणि तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील ज्ञानेश्वर देवकर या दोन जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
जिथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त दुष्काळ, माळरानावरील जनावरांच्या चारा छावणीत लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळीच्या स्वागतासाठी लागलेल्या कमान पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सतीश सोमाणी यांनी जनावरांसाठी चारा छावणी सुरु केली. यात आसपासच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी जनावरे आणली. मात्र काही शेतकरी आपल्या मुलींची लग्न पैसे नसल्याने पुढे ढकलत असल्याचं लक्षात येताच चारा छावणीवर लग्नाची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात राबविली.
या लग्नासाठी बँड बाजा, जेवण, नवरा-नवरीची नटापटा, वऱ्हाडी, मंडप या सगळ्या काही गोष्टींची तयारी ही याच छावणीवर करण्यात आली होती. हे लग्न इतर लग्नाप्रमाणेच होत असल्याने नवरा-नवरीही आनंदी झाले. या लग्नासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आणि अनिल काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांच्यासह तहसीलदार विजय राऊत आणि अन्य मंडळींनी आवर्जून हजारी लावल्याने हा सोहळा वधूवरांसाठी विशेष ठरला.
दुष्काळमध्ये केवळ चारा छावणी चालवणे उदिष्ट नसून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याने शेतकरी जगला पाहिजे हाच उदिष्ट ठेवून आम्ही हा विवाह सोहळा आयोजित केला असून या पुढे ही आम्ही हा उपक्रम कायम ठेवणार असल्याचे छावणी चालक सतीश सोमाणी यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्यात दुष्काळचे भीषण संकट आहे. या संकटाला शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटाला तोंड दिले पाहिजे शासन त्यांच्यासोबत आहे. चारा छावणीवरील विवाह एक आगळा वेगळा उपक्रम असून असे उपक्रम जिल्यात इतर ठिकाणी राबविणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मांडले.
दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत असताना आई संस्थेने चारा छावणीवरील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दिलेला मायेचे आशीर्वाद नवी प्रेरणा देणारा आहे.