नवी दिल्ली: एकीकडं पाकिस्तान (Pakistan) भारताशी (India) आपले संबंध सुधारण्याची भाषा करत आहे. दुसरीकडं हाच पाकिस्तान आपल्या कुरापतींनी भारताला डिवचण्याचाही प्रयत्न करत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून (Pakistani Airspace) जाऊ देण्यास पाकिस्ताननं नकार दिला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mehmood Qureshi) यांनी याबाबत माहिती दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारी (9 सप्टेंबर) आईसलँड, स्वित्झर्लंडआणि स्लोवेनियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यासाठी त्यांना पाकिस्तानमधून जावे लागणार होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील आपल्या रशिया दौऱ्यावर (Rassia Tour) गेले होते. त्यावेळी ते पाकिस्तान मार्गेच गेले होते. त्यावेळी पाकिस्तानने कोणताही विरोध दर्शवला नव्हता. त्यानंतर ही बातमी पाकिस्तानमध्ये पसरल्यानंतर इम्रान खान (Imran Khan) सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.
पाकिस्तानमधून भारतासाठी हवाई मार्ग बंद करण्याची मागणी
जम्मू-काश्मीरचा (Jammu Kashmir) विशेष दर्जा (Article 370) रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधीपक्षासह जनतेचा इम्रान खान सरकारवर दबाव वाढला आहे. मात्र, अद्याप पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई मार्ग पूर्णपणे बंद करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रपती कोविंद यांच्या विमानाला परवानगी नाकारुन त्यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
‘बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाककडून हवाई मार्ग बंद’
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रवारी रोजी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक (Balakot Airstrike) केले होते. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतील मार्ग भारतासाठी बंद केले होते. काही काळाने 27 मार्च रोजी पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई मार्ग आंशिक स्वरुपात खुले केले. त्यावेळी नवी दिल्ली, बँकॉक आणि क्वॉलालंपूरच्या विमानांशिवाय इतर विमानांना परवानगी देण्यात आली होती. 16 जुलै रोजी पाकिस्तानने सर्व नागरी विमानांच्या वाहतुकीला परवानगी दिली होती.