इस्लामाबाद : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानवर विरोधकांनी चौफेर हल्लाबोल केलाय. शिवाय पाकिस्तानी मीडियानेही इम्रान खान सरकार आणि सैन्याला घेरलंय. पाकिस्तानमध्ये आणीबाणीची स्थिती झाली असल्याचा घणाघात पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी केला. तर पाकिस्तान सरकारच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही कठीण प्रश्नांचा सामना करावा लागला.
पाकिस्तानने काय उत्तर दिलं?
पाकिस्तानच्या विमानांनी भारताची विमानं पळवून लावली, असा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पण यावरही पाकिस्तानी मीडियाने त्यांच्याच सरकारची बोलती बंद केली. भारताच्या विमानांना साधा धक्काही लागला नाही, मग आपण काय उत्तर दिलंय? त्यांचे विमानं पाडणं शक्य नव्हतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कुरेशी यांनी उत्तर दिलं, “ही पाकिस्तानच्या सैन्याच्या सामर्थ्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याची वेळ नाही. तुम्ही पाकिस्तानी आहात आणि तुमचा आदर करतो. आम्ही भारताला उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आणि उत्तर देऊ.”
पाकिस्तानी पत्रकार एवढ्यावरच थांबले नाही. एकाने विचारलं, पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एवढा उशीर का लागला? कारण भारतीय सैनिक थेट सीमेत घुसले होते. यावर कुरेश म्हणाले, “पाकिस्तानची वायूसेना पूर्णपणे तयार होती. आपण तयार नसतो तर त्यांची विमानं परत कशी पाठवली असती. आपण भारताच्या कारवाईला सडेतोड उत्तर दिलंय.”
भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम बंद पाडली का?
भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम बंद पाडली होती का, जेणेकरुन ते सीमेत येईपर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, “भारताच्या कारवाईबाबत माहिती मिळाली होती. पण सुरुवातीला नुकसानीबाबत माहिती मिळाली नाही.” विशेष म्हणजे बालाकोटमध्ये दहशतवादी तळ नसल्याचा दावाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला.
बालाकोटमध्ये कोणतंही नुकसाना झालं नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. शिवाय घटनास्थळी आंतरराष्ट्रीय मीडियाला घेऊन जाऊ आणि परिस्थिती दाखवू, असंही पाकने म्हटलंय. पण मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने बालाकोटचा ताबा घेतला असून भारताच्या एअर स्ट्राईकचे पुरावे मिटवण्याचं काम सुरु असल्याचं बोललं जातंय.
VIDEO :