इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. हा दबाव वाढवण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत आणि या प्रयत्नांना यश येताना दिसतंय. पाकिस्तानने दहशतवादी हाफीज सईदच्या दोन संघटनांवर बंदी घातल्यानंतर आता पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय ताब्यात घेतलंय. पाकिस्तानमधील पंजाब सरकारने बहावलपूरमधील मदरसातूल साबिर आणि जामा ए मस्जिद सुभानल्ला हा परिसर ताब्यात घेतलाय. जैश ए मोहम्मद संबंधी कारवाईसाठी पाकिस्तानने एक प्रशासक नियुक्त केला असल्याचंही बोललं जातंय.
पाकिस्तानी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या भागात 70 शिक्षकांची एक संघटना असून यामध्ये 600 विद्यार्थी शिक्षण घेतात. पंजाब पोलिसांकडून या परिसराला सुरक्षा देण्यात आली असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानचा हा कारवाईचा देखावा आहे, की जैश ए मोहम्मदचा संस्थापक दहशतवादी मसूद अजहरला संरक्षण दिलंय असा प्रश्न उपस्थित होतोय.
FATF च्या आदेशानंतर कारवाई?
फायनन्सिअल अॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी FATF ने पाकिस्तानला मे महिन्यापर्यंतची डेडलाईन दिली आहे. FATF ने अल्टीमेटम दिलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत जैश ए मोहम्मद, लश्कर ए तोयबा, अलकायदा आणि तालिबानचा समावेश आहे. या सर्व संघटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी FATF ने केली आहे. पाकिस्तानला यापूर्वीच FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलंय. पाकिस्तानला आता ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाण्याचा धोका आहे.
पाकिस्तानने ही सर्व कारवाई सुरु केलेली असली तरी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे का याबाबतही शंका निर्माण केली जात आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दहशतवादाला बळ देणाऱ्या प्रत्येक शक्तीला वेगळं करण्याचा चंग आंतरराष्ट्रीय स्तरावर बांधण्यात आलाय. भारताकडून पाकिस्तानला वेगळं पाडण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.
व्हिडीओ पाहा :