अमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं!

| Updated on: Jul 22, 2019 | 1:59 PM

म्रान खान अमेरिकेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचा कुठलाही नेता किंवा अधिकारी पोहोचला नाही. इतकंच नाही, तर तिथे कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही.

अमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं!
Follow us on

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तीन दिवसीयअमेरिका दौऱ्यावर आहेत. इथे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ते व्दिपक्षीय चर्चा करणार आहेत. यासाठी शनिवारी (20 जुलै) इम्रान खान हे कतार एअरवेजच्या विमानाने अमेरिकेतील वॉशिंग्टनला पोहोचले. मात्र, या दरम्यान त्यांना मोठा अपमान सहन करावा लागला.

इम्रान खान अमेरिकेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचा कुठलाही नेता किंवा अधिकारी पोहोचला नाही. इतकंच नाही, तर तिथे कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. विमानतळावर इम्रान खान यांच्यासाठी कुठल्याही वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे इम्रान खान आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर लोकांना मेट्रोने त्यांच्या निवासस्थानापर्यंत (पाकिस्तान हाऊस) जावं लागलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेने सर्व प्रोटोकॉल पाळावे यासाठी पाकिस्तानने त्यांना जवळपास 17 कोटी रुपये  देण्याची तयारी दाखवलेली, पण अमेरिकने त्यासाठी नकार दिला. इम्रान खान यांना स्वतःच्या नव्हे, तर कतार एअरवेजच्या नागरी विमानाने तिकीट बूक करुन अमेरिकेला जावं लागलं. त्यानंतर तिथे अमेरिकेचा कुठलाही अधिकारी इम्रान यांच्या स्वागतासाठी पोहोचला नसल्याने अखेर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी आणि अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद एम. खान यांनीच विमानतळावर इम्रान खान यांचं स्वागत केलं. अमेरिकेत झालेल्या या अपमानानंतर इम्रान खान यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

इम्रान खान यांचा पहिला अमेरिका दौरा

इम्रान खान यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. इथे इम्रान खान हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील. यावेळी ते अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांविषयी अनेक मुद्यांवर चर्चा करतील. अमेरिका आणि अफगान तालिबानमधील तणावपूर्ण संबंध एका निर्णायक वळणावर पोहोचले असताना इम्रान खान आणि ट्रम्प यांच्यातील ही भेट होत आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. इम्रान खान हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरुन तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत.

इम्रान खानसोबत पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीदही अमेरिकेत आहेत. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज (22 जुलै) व्हाईट हाऊसला भेट देतील. त्यानंतर 23 जुलैला ते स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचीही भेट घेतील. त्यानंतर ते पाकिस्तानात परततील.