पालघरच्या आदिवासी मुलाकडून एव्हरेस्ट सर!

| Updated on: Jun 04, 2019 | 3:57 PM

.

पालघरच्या आदिवासी मुलाकडून एव्हरेस्ट सर!
Follow us on

पालघर : आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आदिवासी मुलाने एव्हरेस्ट सर केला आहे. मूळचा पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील सांबरपाडा या गावातील केतन जाधव याने ही धाडसी कामगिरी करुन दाखवली आहे. केतन जाधव हा वाडा तालुक्यातील देवगाव येथील माधवराव काणे आश्रमशाळेत 11 वीत शिकतो. केतनने मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर गावातील लोकांनी वाजत गाजत त्याचं स्वागत केलं.

महाराष्ट्र शासनातर्फे मिशन शौर्य-2 ही एव्हरेस्ट शिखर मोहीम राबवण्यात आली. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प विभागामार्फत 11 विद्यार्थांची निवड करण्यात आली. एकूण 200 विद्यार्थांपैकी या 11 विद्यार्थांना निवडण्यात आलं होतं. या 11 विद्यार्थांमध्ये केतन जाधवचीही निवड झाली. त्यानंतर 23 मे रोजी सकाळी पाच वाजून दहा मिनटांनी त्याने एव्हरेस्ट शिखर सर करत ही मोहीम पूर्ण केली. पुढे शिक्षण पूर्ण करुन भारतीय लष्करात भरती होण्याचं केतनचं स्वप्न आहे.

या मोहिमेला केतनची निवड झाल्यानंतर त्याची आई त्याला जाण्यासाठी परवानगी देत नव्हती. मात्र, केतनला पुन्हा अशी संधी मिळणार नाही, त्यामुळे त्याला जाऊ द्या, असं केतनच्या मित्रांनी त्याच्या घरच्यांना समजावलं. केतनची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला अखेर परवानगी दिली. केतनने केलेली कामगिरी ही शब्दात व्यक्त करता येत नसल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं.

केतनने या कामगिरीमुळे महाराष्ट्रात पालघर जिल्ह्याचा मान वाढवला आहे. त्याच्या या मोहिमेमुळे येथील आदिवासी तरुण आणि मुलांमधील आत्मविश्वास वाढला आहे.