पुणे : टाळ मृदुगांचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत फुलांनी सजवलेल्या एस. टी. बसमधून मानाच्या नऊ पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच संतांच्या पालख्या अशाप्रकारे बसमधून पांडुरंगाच्या भेटीला जाणार आहेत. कोरोनाच्या सावटामुळे अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष दरवर्षी काही दिवसांनंतर पोहोचणाऱ्या पालख्या यंदा मात्र अवघ्या काही तासातच पंढरपुरात दाखल होणार आहे. (Pandharpur Wari 2020 Many Palkhi departure to Pandharpur)
पुण्यातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या एस. टी. बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दुपारी पादुकांना नैवेद्य दाखवल्यावर मानाच्या वारकऱ्यांनी पादुका हातात घेऊन बसमध्ये ठेवल्या. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली असा जयघोष केला अन् बस पंढरीकडे मार्गस्थ झाली.
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे विठाई बसमधून प्रस्थान झाले. मुख्य मंदिरात भजन झाल्यानंतर वारकरी संत तुकोबांच्या पादुका घेऊन मंदिर प्रदक्षिणा केली. यानंतर बसच्या पहिलाच सीटवर महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या. विठाई बस निर्जंतुकीकरण करुन आकर्षक फुलांनी सजावट केली होती. त्याचबरोबर डॉग्स स्कॉडकडून संपूर्ण बसची तपासणी करण्यात आली होती. पालखीबरोबर प्रस्थान करणाऱ्या 20 विश्वस्त, सोहळाप्रमुख आणि वारकऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्व वारकऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. साधारण दोनच्या नंतर या बस पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. (Pandharpur Wari 2020 Many Palkhi departure to Pandharpur)
नाशिकमधून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीने यंदा अवघ्या 20 वारकरी प्रतिनिधींसोबत शिवशाही बस मधून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. दरवर्षी सत्तावीस दिवसांनंतर पंढरपूर मध्ये दाखल होणारी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी यंदा मात्र अवघ्या काही तासात पंढरपुरात पोहोचणार आहे.
दरवर्षी त्र्यंबकेश्वरचा संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. यंदा मात्र साधेपणाने पण तितक्यात उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेच्या सुमारास निवृत्तीनाथ महाराजांची षोडशोपचार पूजा विधी पार पडले. त्यानंतर महाराजांच्या मुखवट्याला तसेच चरण पादुकांना कुशावर्तात स्नान घालण्यात आले. यानंतर चरण पादुकांना शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आले. याठिकाणी पोहोचल्यानंतर चंद्रभागेचे स्नान आणि त्यानंतर एकादशी महापूजा असा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे.
औरंगाबादमध्ये संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. एकनाथांच्या पालखीसमोर टाळ मृदुंगाच्या गजरात कार्यक्रम सुरू झाला. ठरलेल्या 20 मानाच्या वारकऱ्यांसह नाथांच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान झाले.
जळगावच्या मुक्ताईनगर भागातून सात मानाच्या पालखीपैकी एक असलेल्या संत आदिशक्ती मुक्ताई पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.
आषाढी एकादशी निमित्त विठूरायाच्या दर्शनाची परंपरा असलेल्या मानाच्या सात पालखीतील एक अशी या पालखीची ओळख आहे. संत परंपरेत लडिवाळ असलेल्या आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळा केवळ 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील श्री विठूराया आणि रुक्मिणीच्या मंदिरावार आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. लक्ष दिव्यानी मंदिराचा परिसर उजळला आहे.
यंदा जरी आषाढी एकादशीचा सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा होणार नसला तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने दरवर्षी प्रमाणे रोषणाई केली आहे. संत नामदेव महाद्वार, संत तुकाराम भवन, पश्चिम द्वार, मंदिराची शिखरांना आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त विनोद जाधव यांनी दरवर्षी प्रमाणे सेवा म्हणून ही रोषणाई करून दिली आहे. (Pandharpur Wari 2020 Many Palkhi departure to Pandharpur)
प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर, 20 वारकऱ्यांसह पंढरपूरची पालखी बसने मार्गस्थ होणारhttps://t.co/ASKiaS5I45
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2020
संबंधित बातम्या :
प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर, 20 वारकऱ्यांसह पंढरपूरची पालखी बसने मार्गस्थ होणार
Pandharpur Wari | मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे