पाणीपुरीनं लावलं गोऱ्या साहेबांना वेड, व्हाईट हाऊसमध्ये नेमकं झालं काय ? पाहा

| Updated on: May 15, 2024 | 10:42 PM

व्हाईट हाऊसचा हा उत्सव खूप छान झाला असे भारतीय वंशाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी म्हटले आहे. या खाद्य महोत्सवात अनेक भारतीय स्ट्रीट फूडचा समावेश होता. यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील नाते संबंध किती दृढ झाले आहेत हे दिसून येते. गेल्या वर्षीही आपण इथे आलो होतो. तेव्हाही गोलगप्पे ( पाणीपुरी ) मेनूचा अविभाज्य भाग होता असे भारतीय वंशाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी सांगितले. या निमित्ताने पाहूयात की पाणीपुरी नेमकी आली तरी कुटून ?

पाणीपुरीनं लावलं गोऱ्या साहेबांना वेड, व्हाईट हाऊसमध्ये नेमकं झालं काय ? पाहा
panipuri
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

पाणीपुरी म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडा पाणी सुटतं…आणि भुक चाळवते. आंबटगोड पाणीपुरी देशातील विविध भागात वेगवेगळ्या नावाने रिचवली जाते. या पाणीपुरीचं वेड आता अमेरिकेतील गोऱ्या लोकांनाही लागलं आहे. अहो गोष्टच तशी घडली आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पाहूण्यांना चक्क पाणी पुरी वाढण्यात आली. मग काय गोरे साहेबांनी डोळ्यात पाणी आणत…हा हूं करीत तिखट आबंट गोड पाणी पुरीवर येथेच्छ ताव मारलाच. निमित्त होतं एशियन अमेरिकन नेटीव्ह हवाईयन अॅण्ड पॅसिफिक आयलॅंडर हेरिटेज सप्ताहाचे….

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाहीभोजनाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी देखील मेन्यूच्या बातम्या झाल्या होत्या. आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये समोशानंतर आता पाणीपुरीने प्रवेश केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पाहुण्यांच्या समोर पाणीपुरीचा देखील मेन्यू ठेवण्यात आला. या कार्यक्रमात आशिया, अमेरिका आणि भारतीय डॉक्टरांनी देखील सहभाग घेतला. व्हाईट हाऊसमध्ये यावेळी सारे जहा से अच्छा या गीताची धून वाजविण्यात आली. अमेरिकेत आता अनेक समारंभात पाणी पुरीला देखील स्थान मिळत आहे. याबाबत नवनवीन प्रयोग केले जात आहेत.

पाणीपुरीला दिल्लीत ‘गोलगप्पा’ म्हणतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने पाणीपुरीला ओळखले जातात. महाराष्ट्रात पाणीपुरी, हरियाणामध्ये पाणीपतशी, मध्य प्रदेशात फुलकी, उत्तर प्रदेशात पाणी बताशे, बंगाल-बिहारमध्ये पुचका आणि गुजरातमध्ये पकोरी असे म्हणतात. TOI च्या बातमीनुसार, अनेक इतिहासकारांचे मते पाणीपुरीमध्ये दोन घटक खूपच महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे बटाटा आणि दुसरी म्हणजे मिरची. या दोन्ही गोष्टी शेकडो वर्षांपूर्वी परदेशातून भारतात आल्या आणि इथल्याच झाल्या. पाणीपुरीचा उगम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 100 ते 125 वर्षांपूर्वी झाला होता असे सुप्रसिद्ध खाद्य तज्ज्ञ पुष्पेश पंत यांनी म्हटले आहे.

पाणीपुरीचा संबंध मगध साम्राज्याशी असल्याचे म्हटले जाते. जिथे पाणीपुरीला ‘फुलकी’ नावाने ओळखले जात. मात्र, त्यावेळी पाणीपुरीच्या आत भरण्यासाठी कोणत्या प्रकारची सामग्री वापरण्यात आली होती, याबाबत विविध मतप्रवाह असल्याचे पुष्पेश पंत यांनी म्हटले आहे. पाणीपुरी म्हणा किंवा गोलगप्पा त्याचा उगम हा ‘राजकचौरी’ या पदार्थापासून झाला आहे. पाणीपुरी बनवताना लहान आकाराच्या पुऱ्या तळून हा जिन्नस तयार केला असण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारे गोलगप्पाचा जन्म झाला असावा असे खाद्यपदार्थ इतिहास तज्ज्ञ पुष्पेश पंत यांनी सांगितले.

पाणीपुरीचे विविध प्रयोग

गोलगप्पा या डीशला तयार करण्यासाठी तिला अधिक चवीची करण्यासाठी, वेगवेगळे प्रयोग राज्यांमध्ये झाले आहेत. काही ठिकाणी उकडलेल वाटाणे तर काही ठिकाणी बटाटे वापरण्यात आले आहेत. काही महानगरात तर मद्यपी लोकांसाठी बारमध्ये पाणीपुरीत मसालेदार पाण्याऐवजी वाईन भरली जात होती. पर्यटक आणि खाद्यप्रेमींना आकर्षित करण्यासाठी त्यात कुठे बियर वा इतर मद्य भरले जायचे आणि त्या पाणीपुरी ‘टकीला शॉट’ असे साजेसे नाव देण्यात आले आहे.

येथे पाहा ट्वीट –


गुजरातमध्ये आइस्क्रीम गोलगप्पा डीश प्रसिद्ध आहे. ही आईस्क्रीम पाणी पुरी सोशल मीडियावर अनेक आठवडे ट्रेंडमध्ये होती. याशिवाय थंड पेयापासून बनविलेली पाणीपुरी देखील खाद्यप्रेमींना भारीच आवडली होती. या संदर्भात नुकताच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. याशिवाय पाच प्रकारचे पाणी असलेले गोलगप्पे देखील पूर्वी लग्नातील पंगतीत बुफे गाजवित होते. दिल्ली-एनसीआर बद्दल बोलायचे झाले तर इथे रव्याची पाणीपुरी जास्त प्रसिद्ध आहे. तर उत्तर प्रदेश, बिहारसह इतर अनेक राज्यांमध्ये मैद्याने बनवलेल्या पाणीपुरीला अधिक पसंती दिली जाते.