परभणीः बॅडमिंटन (Badminton) खेळत असताना हृदयविकाराचा (Heart attack) तीव्र झटका आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना परभणीत घडली. सचिन तापडिया (Sachin Tapdia) असे या व्यक्तीचे नाव असून ते परभणीतील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सकाळच्या वेळी बॅडमिंटन कोर्टवर खेळल्यानंतर बसलेले असताना अचानक ही घटना घडली.. सचिन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते खुर्चीवरून खाली कोसळले. कोर्टवरील खेळाडूंना सुरुवातीला काही कळलंच नाही. काहींनी त्यांना हवा घालण्याचा प्रयत्न केला. ते शुद्धीवर येत नाहीयेत, हे पाहून तत्काळ रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी सकाळची ही घटना असून आज या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.
सचिन तापडिया हे परभणीतील प्रसिद्ध उद्योगपती होते. शहरातील तापडिया मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे ते संचालक होते. गुरुवारी सचिन हे बॅडमिंटनचा एक गेम खेळले आणि काही वेळ खुर्चीवर बसले. त्यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सचिन यांच्या मृत्यूच्या बातमीने परभणीत खळबळ माजली आहे. सचिन यांना दोन मुले असून ती पोरकी झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तम आरोग्यासाठी कोणताही खेळ खेळणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते. मात्र बॅडमिंटन खेळताना सचिन तापडिया यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन हे उत्तम बॅडमिंटनपटू होते. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सचिन यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. सचिन यांच्या अचानक जाण्यामुळे परिवार पोरका झाला आहे. सचिन यांची ड्रायव्हिंग स्कूल तर होतीच, शिवाय फायनान्स आणि इतर उद्योगांमध्येही ते सहभागी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.