बीड : निवडणुकीच्या धामधुमीत बीड जिल्ह्यातील परळीमध्ये झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. पण या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. ही हत्या राजकीय वादातून झाली असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने हे दुहेरी हत्याकांड प्रेम प्रकरणातून झालं असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय.
राष्ट्रवादी नेते पांडुरंग गायकवाड… दोन दिवसांपूर्वीच त्यांची परळीतील ओव्हर ब्रीजच्या खाली धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या राजकीय द्वेषातून झाली असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. मात्र या प्रकरणातलं सत्य वेगळंच आहे.
परळीतील एक 17 वर्षीय तरुण गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाल्याच्या काही तासातच थर्मल परिसरात या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं उघड झालंय.
काय आहे दुहेरी हत्याकांडामागील सत्य?
राष्ट्रवादी नेते पांडुरंग गायकवाड यांच्या ओळखीतील एका महिलेच्या भीचीचे परळीतील 17 वर्षीय मुलाशी संबंध होते. लग्न करण्यासाठी दोघांचाही पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न होता. पण नातेवाईकांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. त्याच दिवशीपासून संबंधित तरुण बेपत्ता होता. त्याआधी राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग यांनी मुलाला असं करु नको म्हणून धमकी दिल्याचा आरोप आहे. हेच पांडुरंग यांच्या जीवावर बेतलं आहे. संबंधित तरुण बेपत्ता आहे यात पांडुरंग यांचा हात असावा हे गृहीत धरुन तरुणाच्या नातेवाईकांनी पांडुरंग यांची हत्या केली.
पांडुरंग यांच्या हत्येनंतर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सदर हत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा जाहीर आरोप केला होता. मात्र पांडुरंग यांची हत्या ज्यांनी केली, ते दुसरे तिसरे कोणी नव्हे तर राष्ट्रवादीमधीलच पांडुरंग यांच्या सहकाऱ्यांनीच केल्याचं उघड झालं. फोटोत धनंजय मुंडे यांच्यासह पांडुरंग आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. यापैकीच तीन जणांनी पांडुरंग यांची निर्घृणपणे हत्या केली.
अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या प्रकरणात मध्यस्थी होऊन तरुणाला ताकीद देणे हेच पांडुरंग गायकवाड यांच्या जीवावर बेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुनील गवारे (शेट्टी), दयानंद बल्लाळ, विजय बल्लाळ, मगर बल्लाळ, प्रदीप गवारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य चार जण फरार आहेत. शिवाय बेपत्ता तरुणाच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.