नवी दिल्ली : युनायटेड किंगडमने (United Kingdom) त्यांच्या देशात अमेरीकन औषध निर्माती कंपनी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला (pfizer biontech covid 19 vaccine) नुकतीच मंजुरी दिली आहे. कोरोना लसीला मान्यता देणारा यूके हा पहिलाच पाश्चिमात्य देश ठरला आहे. त्यामुळे UK मध्ये पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. तसेच बाहरीन देशानेदेखील फायझरच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान युकेमध्ये लसीला मंजुरी मिळाल्यानंतर फायझर कंपनीने त्यांच्या कोरोना लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. (Pfizer applied to Government of India for emergency use of Corona vaccine in India)
युकेमध्ये मंजुरी मिळण्यापूर्वी फायझर कंपनीने दावा केला होता की, त्यांची लस 95 टक्के परिणामकारक आहे. ही जगात सर्वात जलद विकसित केलेली कोरोनावरील लस आहे. ही लस बनवण्यासाठी कंपनीला 10 महिन्यांचा अवधी लागला. एरवी अशा प्रकारची लस तयार करण्यासाठी एक दशकापर्यंतचा कालावधी लागतो. ही लस नव्या जेनेटिक तंत्रज्ञानाच्या आधारावर विकसित करण्यात आली आहे, हे तंत्रज्ञान आजच्या घडीला सर्वोत्तम असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.
भारतासमोर मोठी आव्हानं
या लसीचा साठा (स्टोरेज) करुन ठेवणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे, कारण ही लस -70 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी ठेवावी लागेल. थोड्या प्रमाणात ही लस साठवणे सोपे आहे. परंतु मोठ्या प्रमाणात या लसीचा साठा करुन ठेवणे सध्या तरी आपल्यासाठी अवघड आहे. तसेच आपण तसा प्रयत्न केला तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि पैसे खर्च होणार आहेत. खूप मोठा खर्च करुन आपल्याला एक मजबूत कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं लागेल. तरच आपण ही लस भारतीयांना देवू शकू. भारतीय सरकार त्यासाठी काम करत आहे. तसेच केंद्राने राज्य सरकारांनादेखील त्यासाठीची चाचपणी करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत.
फायझर-बायोएनटेक कंपनीच्या या लसीची अंदाजे किंमत 20 डॉलर्स (1476 रुपये) सांगितली जात आहे. या लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार. फायझर कंपनीने या लसीचा आपत्कालीन वापर करण्यासाठी अनेक देशांशी यापूर्वीच करार केला आहे. त्यामध्ये अमेरिका, युके, युरोपीय संघ (ईयू), बाहरीन आणि जापान या देशांचा समावेश आहे.
संघर्ष संपलेला नाही, लसीकरणाचं मोठं आव्हान : बोरिस जॉनसन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपला नसल्याचे वक्तव्य केलं आहे. कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी लसीकरणाचं मोठं आव्हान समोर असल्याची जाणीव त्यांनी देशवासियांना करुन दिली. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ब्रिटनच्या सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. बोरिस जॉनसन यांनी लसीचा साठा -70 डिग्री सेल्सिअस तापमानाला लस साठवली जात आहे. एका व्यक्तीला दोन वेळा लस देणे आवश्यक आहे. तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये कोरोना लसीचे दोनदा द्यावी लागणार आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी कित्येक महिने लागतील, असं बोरिस जॉनसन यांनी सांगितले.
भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात : पंतप्रधान
भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, “कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वहिली लस (Corona Vaccine) दृष्टीपथात आली आहे. काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन लशीची किंमत निश्चित करण्यात येईल”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. अवघ्या काही आठवड्यात लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना लस या विषयावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (4 डिसेंबर 2020) सहभागी झाले होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्याला कोरोना लशीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले. मी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लस उत्पादनाच्या संदर्भात देशात काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. वेगवेगळ्या टप्प्यावर 8 लसींची चाचणी सुरु आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Video | Corona Vaccine | इंग्लंडमध्ये कोरोना लसीच्या वापराला परवानगी, फायझर कंपनीची लस नागरिकांना दिली जाणार#England #CoronaVaccine #Pfizervaccine pic.twitter.com/BQn8iLUEFp
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 3, 2020
संबंधित बातम्या
मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता
Pfizer | Corona Vaccine | ब्रिटनमध्ये फायझरच्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी
(Pfizer applied to Government of India for emergency use of Corona vaccine in India)