पिंपरी-चिंचवड: फेसबुक आणि व्हॉट्सअपनंतर आता एक नवीन फॅड नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. ते फॅड आहे व्हिडीओ अॅप्लीकेशन टिक-टॉकचं. पण या अॅप्लीकेशनमुळे तुमच्यावर अडचणीची वेळही येऊ शकते. पिंपरी-चिंचवडच्या तीन तरुणांची टिक-टॉकवर व्हिडीओ बनवत असताना चांगलीच फजीती झाली. हे तिघे एका पुलावर टिक-टॉक व्हिडीओ बनवत होते. तेव्हा त्यांच्या मागून पोलिसांची गाडी आली आणि या तिन्ही तरुणांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं. पिंपरी चिंचवडच्या पुलावरचा मनोरंजनाचा हा प्रकार पोलीस स्टेशनच्या पायरी पर्यंत गेला.
फेसबुक, इंस्टाग्राम प्रमाणेच टिक-टॉक अॅप्लीकेशनने तरुण-तरुणींना अक्षरशः वेड लावलेलं बघायला मिळते. टिकटॉकवर अकाउंट उघडून तरुण-तरुणी डंबिंग व्हिडीओ तयार करतात. यावर लाईक्स अन कमेंट्सचा भडीमार होतो. तेच व्हिडीओ इतरांच्या व्हाटसअॅप-फेसबुकच्या स्टेटसवर झळकतात, व्हायरल ही होतात. याचं फॅड दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.
खर्चासाठी पैसे देत नसल्याने, टिकटॉक व्हिडीओचा आधार घेत पत्नीने पतीला कॅन्सर झाल्याची अफवा पसरवली. टिकटॉकवरील हीच बदनामी जिव्हारी लागल्याने पतीने आत्महत्या केल्याचं प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच घडलं.
याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून टिकटॉकवर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह व्हिडीओ टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे, वेळ पडल्यास अटक करण्याचे आदेश ही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
सोशल मीडियावर कोणी कसे व्हिडीओ बनवावे याचं स्वातंत्र्य असलं तरी यातून कुणाची बदनामी करण्याचा अधिकार कुणालाच नाही. तरीही तुम्ही असं काही केलं, तर पोलीस तुम्हाला बेड्या ठोकतील हे मात्र नक्की. तेव्हा यापूढे टिक-टॉक व्हिडीओ बनवताना काळजी घ्या.