पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. तरुणीचं लग्न जमल्याने प्रियकराने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. डांगे चौकात ही थरारक घटना घडली. या तरुणीवर धारधार शस्त्राने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या आरोपी वाकड पोलिसांच्या ताब्यात आहे. चिंचवडमधील वर्दळीच्या डांगे चौकात भर दिवसा हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हल्लोखोर तरुणाचं पीडित तरुणीवर प्रेम होतं. मात्र त्या तरुणीचे नुकतंच लग्न जमलं होतं. हा प्रकार आरोपी प्रियकराला सहन झाला नाही. त्यामुळेच त्याने टोकाचं पाऊल उचलून, तिला संपवण्याचा प्रयत्न केला.
पीडित तरुणी एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. ती आज सकाळी डांगे चौकात आली असता, हल्लेखोराने तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलंय हे कोणालाच कळलं नाही.
दरम्यान, याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.