नवी दिल्ली : एखादी व्यक्ती शिव्या घालत असेल तर त्यावर काहीही व्यक्त न होणं हाच समोरच्या व्यक्तीचा सर्वात मोठा अपमान समजला जातो. हीच परिस्थिती सध्या पाकिस्तानची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi speech) यांनी लालकिल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना विकासाचं व्हिजन समोर ठेवलं. सध्या जम्मू काश्मीर हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. कारण, पाकिस्तानने भारताविरोधात संयुक्त राष्ट्रात जाण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतावर विविध शब्दात टीका केली. पण मोदींनी त्यांच्या 92 मिनिटांच्या भाषणात (PM Modi speech) पाकिस्तानच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. मोदींनी आक्रस्ताळेपणाची साधी दखलही न घेतल्याने पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.
भारतामध्ये 15 ऑगस्ट, तर पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. इम्रान खान यांनी 14 ऑगस्टला पाकव्याप्त काश्मीरमध्ये भाषण दिलं. या भाषणात इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचं नाव घेऊन अनेक पोकळ धमक्याही दिल्या आणि विविध दावेही केले. मोदी या सर्वांवर एखादा शब्द तरी बोलतील अशी पाकिस्तानला अपेक्षा असेल. पण मोदींनी पाकिस्तानची दखलही न घेणंच पसंत केलं.
इम्रान खान यांचं भाषण
इंडिया टुडेने दिलेल्या विश्लेषणात्मक वृत्तानुसार, इम्रान खान यांनी पाकिस्तान या शब्दाचा उल्लेख 12 वेळा केला, जो भाषणात वापरलेल्या काश्मीर या शब्दापेक्षाही कमी आहे. पण मोदींनी भारत आणि भारत हाच शब्द वापरला. पाकिस्तानचा उल्लेखही त्यांनी केला नाही. इम्रान खानच्या भाषणात काश्मीर हा शब्द 20 वेळा वापरला गेला.
इम्रान खानने काश्मीर या नावासोबतच पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वरही निशाणा साधला. विशेष म्हणजे आरएसएसच्या विचारधारेची तुलना हिटलरशाहीशी केली. इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणात भारत हा शब्द 11 वेळा वापरला. यापेक्षा फक्त एक वेळ जास्त म्हणजे 12 वेळा स्वतःच्या देशाचं नाव घेतलं. इम्रान खानच्या भाषणात 7 वेळा आरएसएस, 7 वेळा मोदी आणि 14 वेळा मुस्लीम हा शब्द वापरण्यात आला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणात काय होतं?
‘इंडिया टुडे’ने केलेल्या विश्लेषणानुसार, पंतप्रधान मोदी यांनी विकासावरच जास्त भर दिला. त्यांच्या भाषणात नागरिक या शब्दाचा सर्वाधिक 47 वेळा वापर करण्यात आला. यानंतर स्वातंत्र्य (30), पाणी (24), गरीब (17), दहशतवाद (16), शेतकरी (15), कलम 370 (14), पर्यटन (13) आणि सैन्य हा शब्द 10 वेळा वापरला.
भारताचा एक भाग सध्या दुष्काळाचा सामना करतोय, तर एकीकडे जलप्रलय आहे. हे पाण्याचं नियोजन करण्यावर मोदींनी भर दिला. शिवाय आगामी काही वर्षांसाठीचं व्हिजनही त्यांनी ठेवलं.