नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केकमधील शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एससीओच्या बैठकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली. रशियाकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल मोदींनी पुतीन यांचे आभार मानले. शिवाय भविष्यात संबंध आणखी मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. मोदींना रशियाकडून सर्वोच्च नागरी पुरस्कारही जाहीर करण्यात आलाय. या बैठकीत अमेठीचीही चर्चा झाली.
मोदी आणि पुतीन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. यावेळी मोदी म्हणाले, “मला तुमच्यासारख्या जुन्या आणि विश्वासू मित्राकडून ऊर्जा मिळाली. मी तुमचे आभार मानतो. अमेठीमध्ये रायफल तयार करण्याचा कारखाना आणि त्याची स्थापना करण्यासाठी तुमचा पाठिंबा, तुम्ही त्याची जबाबदारी घेणं यासाठी मी मनापासून आभार मानतो. आपण ठरवलं तर वेळेवर किती काम करु शकतो याचं उदाहरण आपण निर्माण केलंय.”
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी याबाबतची माहिती दिली. बश्किकेमध्ये पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात बैठक झाली. यावेळी पुतीन यांनी सप्टेंबरमध्ये रशियातील व्लादिवोस्तकमध्ये ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये मोदींना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिलंय. मोदींनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे, असं विजय गोखले यांनी सांगितलं.
जापानमधील ओसाकामधील जी-20 समेलनावेळी रशिया, भारत आणि चीन यांच्यात त्रिपक्षीय बैठक होईल, असंही विजय गोखले यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींच्या पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत कोणत्याही आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.