Kumbh Mela : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात काल (24 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. गंगा नदीत शाहीस्नान करुन मोदींच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. या प्रसंगाची कालपासून सर्वत्र चर्चा सुरु आहे. काहीजण पंतप्रधान मोदींचं कौतुक करत आहेत, तर काही जण मोदींची खिल्लीही उडवत आहेत. कुंभमेळ्यात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्री उपस्थित होते.
कुंभमेळ्याची स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचारी प्रचंड मेहनत घेतात. कुंभमेळ्याचा परिसर स्वच्छ ठेवतात. त्यामुळे इथे येणारे जगभरातील लोक इथल्या स्वच्छतेचं कौतुक करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, “प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक गोष्टी येतात, ज्या अविस्मरणीय असतात. आज माझ्याही आयुष्यात एक अशी गोष्ट आली की, मी सफाई कर्माचाऱ्यांचे पाय धुतले. ही वेळ कायम माझ्यासोबत राहील.”, असेही मोदी म्हणाले.
#WATCH: Prime Minister Narendra Modi washes feet of sanitation workers in Prayagraj pic.twitter.com/otTUJpqynU
— ANI UP (@ANINewsUP) February 24, 2019
यंदाच्या कुंभमेळ्यात आतापर्यंत 20 कोटी 54 लाख लोकांनी स्नान केली आहे. कुंभ मेळ्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्री मंडळासोबत गंगेत डुबकी मारली. तसेच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही गंगेत डुबकी मारत कुंभ मेळ्यात पूजा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील स्वच्छतेच्या मिशनसाठी नेहमी नवनवीन गोष्टी करत असतात. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधत 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. एकंदरीत, मोदी नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत पुढाकार घेत असतात. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवण्याचा प्रसंग सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला.
व्हिडीओ : उत्तरप्रदेशमध्ये मोदींकडून शेतकऱ्यांना गुड न्यूज, किसान योजनेचा केला शुभारंभ