नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची मैत्री जगाला माहित आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर नेत्यान्याहू यांनी तीव्र निषेध केलाय. माझे प्रिय मित्र मोदी, मी तुमच्यासोबत, तुमच्या जवानांसोबत आणि पीडितांसोबत खंबीरपणे उभा आहे, असं नेत्यान्याहू यांनी म्हटलंय. इस्रायल आणि भारताचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेत्यान्याहू यांची मैत्रीही चांगली असल्याचं बोललं जातं.
जगभरातील सर्वच महत्त्वाच्या देशांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. अमेरिका, रशिया, फ्रान्स यासह अनेक देशांनी आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. पोर्तुगाल, बेल्जियम, रशिया, एस्टोनिया, सिंगापूर, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, इंडोनेशिया, ओमन, संयुक्त अरब अमिराती, युरोप (29 देश), ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान यासह अनेक प्रमुख देशांनी भारतावर झालेल्या या हल्ल्याविषयी दुःख व्यक्त केलं आहे, शिवाय आम्ही भारताच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानवर थेट हल्लाबोल
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आली आहे. आम्ही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. हे कृत्य पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान समर्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलंय. या संघटनेला संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांनी बेकायदेशीर घोषित केलंय. ही संघटना मसूद अजहरकडून चालवली जाते, ज्याला दहशतवाद मजबूत करण्यासाठी पाकिस्तानने बळ दिलंय. मसूद अजहरकडून भारतावर आणि इतर ठिकाणी हल्ले करण्यात यावेत यासाठी पाकिस्तानने त्याला मुक्तपणे वावर करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आम्ही आंतरराष्ट्रीय सदस्यांना आवाहन करतो, की दहशतवादी लिस्ट करण्याच्या आमच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा, ज्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख, ज्याचा कुख्यात दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
मोदींकडून हल्लेखोरांना इशारा
मी देशाला शब्द देतो, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांची शिक्षा नक्कीच मिळेल, जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावीच लागेल. पुलवामा हल्ल्यामागे जी शक्ती आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणारच, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.