नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर निवेदन करुन, चीनने भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर प्रश्नांची सरबत्ती करुन, जर घुसखोरी केली नाही तर भारताचे 20 जवान शहीद कसे आणि कुठे झाले असा प्रश्न विचारला. या गदारोळानंतर आता पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (PMO clarification on Rahul Gandhis questions)
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करुन, त्यांची विधाने मोडतोड करुन आरोप केले जात आहेत, असं पीएमओने म्हटलं आहे. इतकंच नाही तर, पंतप्रधानांनी स्पष्ट केलं होतं की, लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC)वर भारतीय सैन्याच्या 16 बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनचे डाव उधळून लावला. त्यामुळेच चीनला आमच्या सीमेत घुसता आलं नाही, असंही पीएमओने स्पष्ट केलं.
चिनी सैन्य पूर्ण ताकदीने LAC वर आलं होतं. 15 जूनच्या रात्री गलवान व्हॅलीत हिंसा झाली. कारण चिनी सैन्य LAC वर तळ ठोकण्याच्या तयारीत होतं. त्यादरम्यान गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यामध्ये 20 जवान शहीद झाले, हे पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीनंतरच्या आपल्या निवेदनात सांगितलं, असं पीएमओने स्पष्ट केलं.
आपलं सैन्य सीमेचं रक्षण करत असताना, त्यांचं मनोबल वाढवणे आवश्यक असताना, अशाप्रकारची वक्तवे दुर्दैवी असल्याचा आरोप सरकारने केला आहे. पंतप्रधानांच्या विधानावरुन वाद निर्माण केला तरी भारतीय एकजूट कमी होऊ शकणार नाही, असंही पीएमओने म्हटलं आहे.
राहुल गांधींचे सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर घुसखोरी झाली नसल्याचा दावा केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमकतेनंतर भारतीय भूमी सोपवली. जर चीनची ती भूमी असेल, तर आपले जवान कसे शहीद झाले? आणि हे जवान कुठे शहीद झाले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
PM has surrendered Indian territory to Chinese aggression.
If the land was Chinese:
1. Why were our soldiers killed?
2. Where were they killed? pic.twitter.com/vZFVqtu3fD— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 20, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?
चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. “एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही. सैन्याला सर्व सूट आहे. आमच्याकडेही फायटर प्लेन आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं.
आपल्या सीमेत कुणीही आलेलं नाही. आपली कोणतीही फौज दुसऱ्याच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारताकडे शत्रूच्या नजरेने बघितलं, त्यांना शिक्षा देऊन ते अनेक सैनिक अमर झाले. त्यांचं हे शौर्य आणि बलिदान प्रत्येक भारतीयांच्या मनात राहील, असं मोदी म्हणाले होते.
(PMO clarification on Rahul Gandhis questions)
संबंधित बातम्या