Corona Effect : वाशिममधील पोहरादेवी, उमरी खुर्द यात्रा रद्द, 23 मार्चपासून 8 वाहतूक मार्ग बंद

| Updated on: Mar 15, 2020 | 8:49 AM

वाशिममधील पोहरादेवी आणि उमरी खुर्द यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. (Yatra canceled due to Corona in Washim).

Corona Effect : वाशिममधील पोहरादेवी, उमरी खुर्द यात्रा रद्द, 23 मार्चपासून 8 वाहतूक मार्ग बंद
Follow us on

वाशिम : राम नवमी दरम्यान पोहरादेवी, उमरी खुर्द येथे यात्रेनिमित्त देशभरातून लाखो भाविक येतात (Yatra canceled due to Corona). मात्र सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोहरादेवी, उमरी खुर्द येथे 25 मार्च ते 2 एप्रिल 2020 दरम्यान होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा कोरोना विषाणू प्रतिबंधक मोहिमेचे नोडल अधिकारी हृषिकेश मोडक यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 नुसार याबाबत आदेश दिले. तसेच 23 मार्चपासून पोहरादेवीकडे जाणाऱ्या 8 मार्गांवरील वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात जनावरांपासून झाल्याचं लक्षात आलं आहे. पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान आणि उमरी खु. येथील यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आणली जातात. या जनावरांमधून साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. पोहरादेवी, उमरी खु. यात्रा कालावधीत देशभरातून येणाऱ्या भाविकांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आल्यास इतर हजारो भाविकांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेमध्ये जमलेल्या भाविकांना या विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी पोहरादेवी, उमरी खुर्द येथे येणाऱ्या व्यक्ती, भाविकांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ३ मार्च २०२० रोजीच्या प्रतिबंध आराखड्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर रहावे म्हणून गर्दी, यात्रा, मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवून जीवित हानी होवू नये, यासाठी पोहरादेवी, उमरी खुर्द येथील यात्रा रद्द करण्यात आल्याचे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

पाळीव प्राणी वाहतूक, बळी देणे, मंडप (स्टॉल) लावण्यास मनाई

पोहरादेवी व उमरी खुर्द येथे यात्रेकरिता देशभरातून भाविक येतात आणि यात्रेमध्ये पारंपारिक प्रथेनुसार बोकुड आणि कोंबड्या यांचा बळी देण्याची प्रथा आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्च ते 2 मार्च 2020 दरम्यान होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागात पाळीव प्राण्यांचे बळी आणि प्राणी वाहतुकीला यात्रा कालावधीत प्रतिबंध करणे, हॉटेल, प्रसाद आणि इतर दुकानांचे मंडप (स्टॉल) लावण्यासाठी प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

उमरी खुर्द येथे 23 मार्च 2020 ते 5 एप्रिल 2020 या कालावधीत अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. यात पाळीव प्राण्याचा बळी देण्यास, पाळीव प्राण्याची वाहतूक करण्यास, पाळीव प्राणी जमवण्यास आणि हॉटेल, प्रसाद व इतर दुकानांचे मंडप (स्टॉल) लावण्यासाठी निर्बंध याचा समावेश आहे.

पोहरादेवीकडे जाणाऱ्या 8 मार्गांवरील वाहतूक 23 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान राहणार बंद

पोहरादेवी, उमरी खुर्द येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि इतर राज्यातून लाखो भाविक राम नवमी दरम्यान होणाऱ्या यात्रेसाठी येतात. मात्र देशात, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोहरादेवी, उमरी खुर्द येथे 25 मार्च ते 2 एप्रिल 2020 या कालावधीत होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरीही बाहेरून येणारी वाहने पोहरादेवी, उमरी खु. येथे आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 23 मार्च ते 5 एप्रिल 2020 या कालावधीत पोहरादेवीकडे जाणारे 8 मार्ग बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा कोरोना विषाणू प्रतिबंधक मोहिमेचे नोडल अधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत.

बंद करण्यात येणारे मार्ग

1. यवतमाळ-दिग्रस-वाईगौळ-पोहरादेवी मार्ग

2. पुसद-सिंगद-पोहरादेवी मार्ग

3. पुसद-ज्योतिबानगर-सेंदोना-पोहरादेवी मार्ग

4. वाशिम-धानोरा-शेंदूरजना-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग

5. मंगरुळपीर-मानोरा-गव्हा-रतनवाडी-पोहरादेवी मार्ग

6. कारंजा-मानोरा-पंचाळा फाटा-पोहरादेवी मार्ग

7. गवली-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग

8. दारव्हा-बोरव्हा-कुपटा-पोहरादेवी मार्ग

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या : 

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण

Yatra canceled due to Corona