पुणे : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून राज्यपालांची वारंवार भेट घेण्यावरुन विरोधी पक्षावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनातून राज्यपालांच्या भेटी घेणाऱ्यांना चक्रम वादळ असं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सामनातील प्रतिक्रियेला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची टीका केली आहे (Pravin Darekar on Saamana critics). तसेच सामनाची नेहमीच आधी टीका करणं आणि नंतर लोटांगण घेणं अशी भूमिका राहिल्याचाही आरोप करण्यात आला.
विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेसंदर्भात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, “सामना’च्या सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया देणे आवश्यक वाटत नाही. त्यांची भूमिका नेहमीच टीका करणं आणि नंतर लोटांगण घेणं अशी राहिली आहे. ते पंतप्रधानांवर आधी टीका करतात आणि नंतर कौतुक करतात. त्यामुळे सामनातील प्रतिक्रिया गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सामना कोण वाचणार असा प्रश्न असल्यानेच अशी टीका केली जात आहे. राज्यपाल हे कुलपती असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि गुणवत्ता टिकली पाहिजे हीच राज्यपालांची भूमिका आहे.”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख केला असेल तर आम्हाला पोटशूळ होण्याचं काहीच कारण नाही. आम्हाला त्याबद्दल कोणतीही असुया नाही. शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा खासगी एजन्सीचा सर्वे आहे. असं असेल तर त्यांच्या उत्कृष्टतेचं कारभारात प्रतिबिंब दिसलं पाहिजे,” अशीही प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
सामनात नेमकं काय म्हटलं आहे?
“राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे” अशा कानपिचक्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.
“राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरुन मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरु आहे. राज्यपालांच्या सद्सदविवेकबुद्धी बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे” अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेत पोलिसांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुनावल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. “एक दिवस संतप्त विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर येतील आणि घोळ घालून एक पिढी बरबाद करणाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्यांना सुनावतील, “तुमच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आमचा छळ का करता? बोलण्यासारखे, करण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा” असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“कोरोना संकटात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार म्हणून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी-पालक आणि शिक्षण तज्ञांनी याचे स्वागत केले. मात्र प्रत्येक बाबतीत विरोधच करायचे, असे ठरवून काम करत असलेल्या विरोधी पक्षाने तात्काळ राजभवन गाठले आणि परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला. विरोधकांचे पत्र मिळताच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणारे पत्र लिहिले” अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखात ताशेरे ओढण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
राजभवनाच्या दारावर काही ‘चक्रम वादळे’ अधूनमधून आदळतात : सामना
अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, त्याचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार घेऊ : राज्यपाल
Pravin Darekar on Saamana critics